Loksabha 2019 : एनसीपीचे स्टार प्रचारक कुठे आहेत?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भाजपने अडवले राष्ट्रवादीचे नेते?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच सध्या एकमेव नेते विदर्भात सभा घेत आहेत. त्यांच्या सोबतीला कोणी दिसत नाहीत. आघाडीतील इतर पक्षांचे नेते प्रचारात उतरलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रातच अडकवून ठेवल्याची चर्चा आहे.

नागपूर - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी असली, तरी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे आहेत, असा सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. विशेष म्हणजे, प्रचारासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याची सभा येथे आयोजित नाही. तसे नियोजनही नाही.

नागपूर शहराला विदर्भाची राजधानी मानली जाते. येथूनच विदर्भभर संदेश पोहोचविला जातो. विदर्भातील प्रचाराचा श्रीगणेशा नागपूरमध्ये केला जायचा. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त सभा यापूर्वी येथे झालेल्या आहेत. यंदाही भाजपला पराभूत करण्यासाठी बडे नेते विदर्भात हजेरी लावतील. दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त सभा होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. राष्ट्रवादी सोडा काँग्रेसचाही एकही स्टार प्रचारक नागपूरला आलेला नाही. त्यामुळे नाना पटोले यांना कार्यकर्त्यांच्या भरवशावरच गल्लोगल्ली पदयात्रा कराव्या लागत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसने भाजपला पराभूत करण्यासाठी विविध पक्ष व संघटना अशा एकूण ५६ जणांचा आघाडीत समावेश केला आहे. महाआघाडीत नागपुरात काँग्रेसचा तर भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. येथेही अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही बड्या नेत्याने हजेरी लावलेली नाही.

राहुल गांधींच्या सभेवर मदार
केंद्रीय मंत्री व भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते नागपुरात प्रचारासाठी येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना बळ दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्याप राष्ट्रवादीचा एकही स्टार प्रचारक नागपूरमध्ये फिरकलेला नाही. त्यामुळे नाना पटोले यांची सर्व मदार आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेवरच अवलंबून आहे.

Web Title: Loksabha Election 2019 NCP Star campaigner BJP Politics