Loksabha 2019 : गडकरींचे विकासकारण, तर पटोलेंचे समाजकारण

राजेश चरपे
बुधवार, 3 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न

  • चौराही धरणामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट
  • मिहान औद्योगिक क्षेत्रात अजून मोठ्या कंपन्या वळल्या नाहीत
  • नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतुकीची दयनीय अवस्था 
  • वाढत्या गुन्हेगारीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न

नागपूरच्या रिंगणात इतर कुठल्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले अशी थेट लढत होत आहे. गडकरींचे विकासकारण, तर पटोले यांचे समाजकारण सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा मतविभाजनाची शक्‍यता नसल्याने लढत चुरशीची होणार आहे.

भाजपचे माजी अध्यक्ष, विद्यमान मंत्री नितीन गडकरी यांनी मागील निवडणुकीत तब्बल पावणेतीन लाखांचे मताधिक्‍य घेतले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळात ७० हजार कोटींची विकासकामे केल्याचा त्यांचा दावा आहे.

नागपुरात प्रत्यक्षात मेट्रो ट्रेन धावायला लागली नसली, तरी ऐंशी टक्के कामे पूर्ण झालीत, ही मोठी जमेची बाजू आहेच. जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे शहरात सुरू आहेत. ‘आयआयएम’, ‘सिम्बॉयसिस’ यांच्यासारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्था नागपुरात आहेत. नागपूरचे बदलते रूप सर्वसामान्यांना भावताना दिसतंय. याहीपेक्षा गडकरींच्या नावाचे वलय शहरात जाणवतंय. त्यांच्याविषयी आकर्षण आहे. भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते.

नागपूरमध्ये काँग्रेस गटातटात विखुरली आहे. लोकसभेसाठी अनेक जण येथून इच्छुक होते. मात्र, काँग्रेसने मूळचे भंडाऱ्याचे असलेले नाना पटोले यांना उमेदवारी दिली. त्यांना येथील कार्यकर्ते कितपत स्वीकारतात, हे पाहावे लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच गट त्यांच्यासोबत होते.

वरूनही काही आदेश आले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते सध्या त्यांच्यासोबत फिरताना दिसत आहेत. भाजपचे परंपरागत विरोधक म्हणून मुस्लिम आणि दलितांची मोठी व्होट बॅंक आहे. याशिवाय कुणबी समाजाचे मताधिक्‍य आहे. त्याची मोट बांधण्याचे काम पटोले करीत आहेत. विशेष म्हणजे, या वेळी मतविभाजन जास्त होणार नाही. ‘बसप’ने त्यांचेच नगरसेवक मोहम्मद जमाल, तर वंचित बहुजन विकास आघाडीने सागर डबरासे यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी, ‘बसप’मुळे होणारे मतविभाजन यंदा फारसे होणार नाही. त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: Loksabha Election 2019 Nitin Gadkari Nana Patole Politics