Loksabha 2019 : गडकरींसाठी स्वराज, उमा भारती आज शहरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारती, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी (ता. दोन) शहरात येणार आहेत.

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारती, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी (ता. दोन) शहरात येणार आहेत.

मंगळवारपासून गडकरी यांची थेट मतदार संपर्क रॅलीलाही प्रारंभ होणार आहे.
शहरात सध्या नगरसेवक, मनपा पदाधिकारी भाजपचा गल्लीबोळात प्रचार करीत आहेत. सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारसभांना मार्गदर्शन करीत आहे. मंगळवारी त्यांच्यासोबत प्रचारसभांना केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारतीही उपस्थित राहणार आहेत. रात्री आठ वाजता पश्‍चिम नागपुरात सुरेंद्रगढ येथे उमा भारती नागरिकांशी संवाद साधतील. तसेच मध्य नागपुरातही त्या कार्यक्रमात सहभागी होतील. जगनाडे चौकातील महिला मेळाव्याला तसेच अग्रसेन भवनातील कार्यक्रमातही केंद्रीय  मंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता उत्तर नागपूर क्षेत्रातील वैशालीनगर भाजप कार्यालय येथून प्रचार रॅली सुरू होणार आहे. भाजपचे निवडणूकप्रमुख आमदार सुधाकर देशमुख, शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार मिलिंद माने, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  अशोक मेंढे, उत्तर नागपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष दिलीप गौर, प्रभाकर येवले, वीरेंद्र कुकरेजा, नवनीतसिंग तुली, शिवसेनेचे बंडू तळवेकर, किशन ठाकरे, सुनील बॅनर्जी, मनोज शाहू, किसन प्रजापती, रिपाइं(आ)चे बाळू घरडे, राजन वाघमारे, लोजपाचे सतीश लोणारे, लाला कुरेशी यांच्यासह युतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅलीचा समारोप  एनआयटी चौकात होईल.

Web Title: Loksabha Election 2019 Nitin Gadkari Uma Bharti sushma swaraj Politics