Loksabha 2019 : नव्या सारीपाटावर जुन्याच सोंगट्या!

मनोज भिवगडे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न
    अकोला-खंडवा ब्रॉडग्रेज रेल्वे मार्गाचे रखडलेले काम
    सात प्रमुख सिंचन प्रकल्पांची अर्धवट कामे
    विमानतळ विस्तारीकरणाचे भिजत घोंगडे

मतदारसंघात पुन्हा त्याच उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. तरीही जातीची समीकरणे, विकासाच्या मुद्द्यांना बगल देत केंद्राच्या कारभारावरील आरोप-प्रत्यारोप अशा मुद्द्यांवर दिला जाणारा भर हे सर्व मतदारांना किती भावते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

एखादी व्यक्ती नशीब घेऊनच जन्माला येते, असे म्हणतात. ही बाब अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबाबत तंतोतंत जुळते. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानंतर ज्या खासदारांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा होती त्यात धोत्रे यांचाही समावेश होता. मात्र, नशिबाची साथ मिळाल्याने त्यांची उमेदवारी कायम राहली. काँग्रेसनेही ऐनवेळी उमेदवार बदलला आणि हिदायत पटेल यांनाच कायम ठेवले. यामुळे अकोला मतदारसंघात सारीपाट नवीन असला, तरी सोंगट्या जुन्याच आहेत.

अकोला १९८४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या वेळेपर्यंत अकोल्याच्या  रिंगणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा उदय झाला होता. त्यानंतर पुढच्या प्रत्येक निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा भाजपला झालाय. १९९८ आणि १९९९ च्या निवडणुकांत आंबेडकर निवडून आले. मात्र, त्यांना काँग्रेसची साथ होती. २००४ पासून संजय धोत्रे निवडून येत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत धोत्रेंचे प्रतिस्पर्धी काँग्रेसतर्फे हिदायत पटेल आणि ‘भारिप-बमसं’चे आंबेडकर होते. आता पुन्हा याच तिघांमध्ये निवडणूक रंगणार आहे. पटेलांच्या उमेदवारीने आंबेडकरांची चिंता वाढवली असली, तरी धोत्रेंचा गट बिनधास्त आहे. प्रचारात विकासाचा मुद्दा नाही. आंबेडकर त्यांच्या प्रचारात काही स्थानिक मुद्दे मांडत असले, तरी त्यांचा भर काँग्रेसच्या उमेदवारावरच आहे. काँग्रेसने स्थानिकऐवजी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणे व मोदींमुळे मुस्लिम कसे अडचणीत आहेत, हा प्रचाराचा मुद्दा केलेला दिसतो.

Web Title: Loksabha Election 2019 Politics Akola Constituency