Loksabha 2019 : जेवढे मोठे कुंकू तेवढे जास्त नवरे - जयदीप कवाडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

महिलांमध्ये संताप
जयदीप कवाडेंच्या वक्तव्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेकांनी कवाडे व पटोले यांनी माफी मागावी अशी मागणीही केली आहे. कवाडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पटोले अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. विरोधकही याचे भांडवल करीत आहे. गुरुवारी राहुल गांधी यांची नागपूरमध्ये जाहीर सभा आहे. कवाडेंच्या वक्तव्याची क्‍लिप त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे समजते.

नागपूर - महिलेच्या कपाळावर जेवढे मोठे कुंकू तेवढे नवरे जास्त असतात, अशी मुक्ताफळे उधळणारे तसेच केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त महिलांचा अपमान करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची प्रचारसभा सोमवारी कुंभार टोली येथे झाली. सभेत भाषण देताना कवाडे यांची जीभ चांगलीच घसरली. स्मृती इराणी कपाळावर मोठे कुंकू लावतात यावरून त्यांना अनेक नवरे असल्याचे आक्षेपार्ह विधानही त्यांनी केले. भाषणानंतर नाना पटोले यांनी त्यांची पाठ थोपटून त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज दिवसभर कवाडे यांच्या वक्तव्याची चर्चा होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी कवाडेंची मुक्ताफळे प्रसारित केल्याने नाना पटोलेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. 

कवाडेंचे वक्तव्य आणि त्याचे समर्थन करणारे पटोले यांनी समस्त महिलांचा अपमान केला आहे. आदर्श आचार संहितेचाही भंग केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार राहुल खंगार, योगेश पाचपोर, बाल्या रारोकर, सुनीता पाटील, रोहित जामडे, वरुण गजभिये यांनी केली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Politics Jaideep Kawade Complaint Smriti Irani