Loksabha 2019 : धानोरकरांच्या कार्यालयावर छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन घरावर प्राप्तिकर विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

चंद्रपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन घरावर प्राप्तिकर विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

भाजपला पराभव दिसत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. चुकीच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई केली, असे प्राप्तिकर विभाग सांगत आहे.

चंद्रपुरातील जिल्हा क्रीडासंकुलासमोर बाळू धानोरकर यांचे नवे घर बांधले जात आहे. याच घरी त्यांनी पक्षाचे कार्यालय उघडले आहे. या ठिकाणी कार्यकर्ते फक्त आराम करायला येतात व येथे धानोरकर अपवादानेच येतात. उद्या (ता. 11) मतदान असल्याने बूथनिहाय मतदानाची यादी पुरविण्याचे काम या कार्यालयातून सुरू होते. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे पथक आणि पन्नास पोलिसांचा ताफा कार्यालयात धडकला. या वेळी कार्यालयात कार्यकर्ते उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सर्वत्र झडती घेतली. सोफा, बेड आणि शौचालयासह संपूर्ण घर तपासले. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचीही झडती घेतली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
कॉंग्रेसच्या समर्थकांनी याचा जोरदार निषेध सोशल मीडियातून केला. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत. नाव न छापण्याच्या अटीवर पथकातील एका अधिकाऱ्याने चुकीच्या माहितीच्या आधारवर ही कारवाई झाली, असे कबूल केले.

भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदानापूर्वी बदनाम करण्यासाठी हे छापासत्र राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहीर यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली.
- विजय वडेट्टीवार, विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते

निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. भाजपने राजकारणाची हीन पातळी गाठली. कारवाई करायची होती, तर अहिरांच्याही कार्यालयावर छापा मारायला हवा होता.
- सुरेश धानोरकर, कॉंग्रेसचे उमेदवार

Web Title: Loksabha Election 2019 Raid on Suresh Dhanorkar Office Politics