Loksabha 2019 : नाट्यमयरित्या सुटला रामटेकचा तिढा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्याला विराम मिळाला.

नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर उत्तमराव गजभिये यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्याला विराम मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील दिग्गजांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. 

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने नाना पटोले यांचे नाव जाहीर केल्यानंतर रामटेकमधून कुणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रामटेकमधून काँग्रेसचे महासचिव तथा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक (सीईसी) समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र, अचानक माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांचे नाव समोर आले. मात्र, त्यानंतर त्यांचे नाव मागे पडत राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्याही नावाची चर्चा रंगली. अखेर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुकुल वासनिक यांनी रामटेकमधून निवडणूक लढवावी, असा हट्टच धरला. मात्र, रविवारी सायंकाळी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक (सीईसी) समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी किशोर गजभिये यांच्या नावाची घोषणा केली  अन्‌ गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला. 

रामटेकमधून उमेदवारीसाठी राज्याचे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, राज्याच्या लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य गजानन जांभूळकर, काँग्रेसचे नेते महादेव नगरारे यांनी काँग्रेस समितीकडे अर्ज केले होते.

नितीन राऊत यांना दुसऱ्यांदा पछाडले
किशोर गजभिये यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. मागील वर्षी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी बसपच्या उमेदवारीवर त्यांनी उत्तर नागपुरातून विधानसभा निवडणूक लढविली आहे. ते तत्कालीन मंत्री नितीन राऊत यांच्यापेक्षा जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. रामटेकची उमेदवारी मिळविण्यातही राऊत आघाडीवर होते. परंतु, येथेही गजभिये यांनी त्यांना मागे टाकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Ramtek Issue Solve Politics Congress Kishor Gajbhiye