पाच मिनिटे रायफल पकडून दाखवा- राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

मोदींनी केवळ पाच मिनिटे रायफल पकडून उभे राहून दाखवावे, जम्मू-काश्‍मिरात बसमधून एकटे फिरून दाखवावे, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिले.

चंद्रपूर/वर्धा - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाने पाकिस्तानात घुसून बाँबहल्ला केला. हे शौर्य आपल्या जवानांनी गाजवले असताना पंतप्रधान मोदी मात्र हे हल्ले मी घडवून आणले, असे सांगत सुटले आहेत. मोदींनी केवळ पाच मिनिटे रायफल पकडून उभे राहून दाखवावे, जम्मू-काश्‍मिरात बसमधून एकटे फिरून दाखवावे, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिले.

नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याची घोषणा केली. ती चांगली कल्पना होती; पण ती ‘थाप’ निघाली. त्यांच्याच कल्पनेवरून काँग्रेसच्या ‘थिंक टॅंक’ने देशातील २० टक्के गरिबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्याची ‘न्याय’ योजना तयार केली आहे. मात्र, ही ‘थाप’ नाही. अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आम्ही हा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी शुक्रवारी चंद्रपूर व वर्धा येथे सभा घेतली. 

‘न्याय’ योजनेंतर्गत पाच वर्षांत तीन लाख ६० हजार रुपये मिळतील. कोणत्याही व्यक्तीची मिळकत १२ हजारांपेक्षा कमी असेल, अशा प्रत्येक घटकाला या योजनेचा फायदा मिळेल. हे पैसे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्यात जातील. मोदींनी मूठभर कोट्यधीशांना अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ केले. आम्ही गरिबांना पैसे देऊ, असे ते म्हणाले. ‘मै प्रधानमंत्री नही, चौकीदार बनना चाहता हू’ असे मोदी म्हणाले होते. मात्र, कोणत्या गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या घरी चौकीदार असतो? हे श्रीमंतांचे चौकीदार आहेत, असा आरोप  त्यांनी केला. 

मोदींनी अडवानींचा अपमान केला!
हिंदू धर्मात सर्वांत मोठे नाते गुरू-शिष्यांचे असते. लालकृष्ण अडवानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरू आहेत. शिष्य गुरूंसमोर हात जोडतात; पण मोदी आपल्या गुरूला साधा नमस्कार करीत नाहीत, हे मी बघितले आहे. त्यांनी तर अडवानींना अपमानास्पदरीत्या मंचावरून खाली उतरविले, अशी टीका राहुल गांधींनी केली. हिंदू धर्मात द्वेष, धर्मांधता, सूड उगविणे हे कुठे लिहिले आहे? आमचे संस्कार प्रेमाचे आहेत, सूडाचे नाहीत. काँग्रेस सर्व समाजांना जोडण्याचे काम करते, असे ते म्हणाले.

Web Title: Modi should stand and hold the rifle for only five minutes says rahul gandhi