Loksabha 2019 : गोंदियातील सभेत मोदी कडाडले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. महाराष्ट्रातील प्रचाराची सुरवात त्यांनी काही दिवसांपूर्वी वर्ध्यातून केली होती. भाजप-शिवसेना-रिपाइं (आ.)चे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ येथील बालाघाट रोडस्थित अटलधाम मैदानात त्यांनी आज सभा घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे दीपक सावंत आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषण सुरू करून आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यास आलो आहे, असे सांगून उपस्थितांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ""यापूर्वीही अनेकदा निवडणुकीचा प्रचार केला. परंतु, जनतेमध्ये अशी लहर कधीच दिसली नाही. देशाच्या मनात काय आहे, हे या सभेतील उपस्थितांच्या उत्साहावरून दिसते. महाआघाडीला धडा शिकविण्याचा संकल्प जनतेने केला आहे. त्यामुळे त्यांचा सफाया होईल,'' असे मत मोदी यांनी व्यक्‍त केले. 

कॉंग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे? 
मोदी म्हणाले, ""कॉंग्रेसने जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. असे आश्वासन देऊन कॉंग्रेसवाले देशद्रोह्यांना अभय देण्याचे काम करीत आहेत. माजी संरक्षणमंत्री असणाऱ्या शरद पवार यांना कॉंग्रेसचा हा जाहीरनामा मान्य आहे का?'' तसेच, कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाच्या जवानांचा अपमान करणारा आहे, असा आरोप केला. 

मोदी म्हणाले, ""आम्ही घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला असून, कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कटाचा भाग आहे. आमची मागील पाच वर्षे "यूपीए' सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली. तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार होईल. दिल्लीत "एसी'मध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. मोदींचे नाव घेतले की त्यांची झोप उडत आहे. लोक बालाकोट विसरले, असे ते म्हणत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, देश अजून 1962 चे युद्ध विसरलेला नाही, तर बालाकोटचा हल्ला कसा विसरेल.'' 

जागरूक राहा 
""आता देशाची दिशा आणि दशा बदलत आहे. मात्र, याचवेळी कॉंग्रेस अस्थिरता निर्माण करीत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे. जे जवान नक्षलवाद आणि दहशतवादाच्या विरोधात लढतात; त्या शूरवीरांचे मनोबल कमी करणारा हा जाहीरनामा आहे. त्यामुळे जनतेला जागरूक राहावे लागेल. त्यांना एक जरी संधी मिळाली तर नक्षलवाद, दहशतवाद्यांची हिंमत वाढेल,'' असे मोदी म्हणाले. 

देश तोडण्याचे षड्‌यंत्र 
मोदी म्हणाले, ""देशातील अनेक राजकारणी शहरी नक्षलवाद्यांबरोबर काम करतात, हे तुम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे ते आता देशद्रोहाचा कायदाच रद्द करण्याची मागणी करीत आहेत. हे देशाला तोडण्याचे षड्‌यंत्र नाही तर काय आहे? त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. 2014 पूर्वी देशात जसे चालत होते, तसेच चालत राहावे, असे त्यांना वाटते. तेव्हा जवान, शेतकरी, युवक सगळे त्रस्त झाले होते. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे मध्यस्थांच्या खिशात जात होते. हे आता चालत नाही, म्हणून त्यांना धडकी भरली आहे.'' 

""गेल्या पाच वर्षांत शौचालये बनविण्यापासून ते अंतराळापर्यंत अनेक क्षेत्रांबाबतचे निर्णय आम्ही घेतले. हे सर्व जनतेच्या आशीर्वादाने शक्‍य झाले. गेल्या 70 वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांत झालेले खड्डे भरण्यात पाच वर्षे गेली. आता विकासाचा नवीन "हायवे' बनवायचा आहे. तुमचा विश्‍वास हीच माझी पूंजी आहे. देशातील दलित, आदिवासी, वंचित, शोषित या सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा आहे,'' असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाली 
""राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा आजकाल त्यांना झोप का येत नाही? कारण, त्यांची झोप दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकली आहे. मला सगळे काही सांगायचे नाही. पण, जो आत गेला आहे त्याने काही बोलले तर काय होईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. सगळे सत्य समोर येईल. तो दिवस लांब नाही,'' असे सूचक विधानही नरेंद्र मोदी यांनी या वेळी केले. 

मोदी म्हणाले 
महायुती विरोधकांची महामिलावट साफ करेल, 
याआधी शेतकरी, तरुणवर्गही चिंतेत होता. 
जनतेच्या आशीर्वादामुळेच विकास करता आला 
आशीर्वादाबद्दल तुमचे आभार मानायला आलो 
पुढील पाच वर्षांसाठी तुमचे आशीर्वाद हवेत 
लोक बालाकोटमधील कारवाई विसरले नाहीत 
पाच वर्षांत "यूपीए'च्या चुका निस्तरल्या 
देशद्रोह रद्द करू पाहणाऱ्यांना संधी देणार का? 
कॉंग्रेस देशात अस्थिरता निर्माण करते आहे 
कॉंग्रेसचा जाहीरनामा जवानांचा अवमान 

Web Title: narendra modi meeting in gondia