Loksabha 2019 : मतदानासाठी सज्ज 107 वर्षांचा 'तरुण'

सुनील शेडगे
बुधवार, 17 एप्रिल 2019

नागठाणे : मतदान हा लोकशाहीतील महत्त्वपूर्ण हक्क. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत हा हक्क मोठ्या उत्साहाने बजाविणारा एक 'तरुण' आहे. वय विचाराल तर ते आहे अवघे 107 वर्षे. 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठीही हा 'तरुण' तितक्याच उत्साहाने सज्ज झाला आहे.

नागठाणे : मतदान हा लोकशाहीतील महत्त्वपूर्ण हक्क. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत हा हक्क मोठ्या उत्साहाने बजाविणारा एक 'तरुण' आहे. वय विचाराल तर ते आहे अवघे 107 वर्षे. 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठीही हा 'तरुण' तितक्याच उत्साहाने सज्ज झाला आहे.

हणमंत तात्याबा पडवळ हे त्यांचे नाव. ते 'बाबा' या नावाने परिचित आहेत. बाबा हे पूर्वाश्रमीचे प्राथमिक शिक्षक. त्यांचा जन्म 1913 मधला. नऊ मार्च ही त्यांची जन्म तारीख. कोरेगाव तालुक्यातील तडवळे, भाडळे, जावळी तालुक्यातील मेढा, हुमगाव, आनेवाडी, रायगाव तसेच सातारा तालुक्यातील दहिवड- पुनवडी, परळी, शेंद्रे या गावांतून त्यांनी आपली सेवा बजावली. मुख्याध्यापकपदावरुन ते निवृत्त झाले. 1931 ते 1971 हा त्यांच्या सेवेचा कालखंड. 

उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वात पहिल्या निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची संधी लाभली. त्या आठवणी अजूनही बाबांच्या मनात ताज्या आहेत. तेव्हा सायकल, घोड्यावरून प्रचार व्हायचा. उमेदवार, कार्यकर्ते स्वतःची भाकरी बांधून प्रचाराला यायचे, असे बाबा सांगतात.

आपला पहिला मतदानाचा हक्क त्यांनी हुमगावलगतच्या आखाडे या गावात बजावला होता. त्या निवडणुकीत बाबासाहेब आखाडकर विजयी ठरले होते. त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा वा लोकसभा प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. 

अलीकडच्या काळात कुटुंबियांनी त्यांच्या वयाची 'शताब्दी' मोठ्या उत्साहात साजरी केली. बाबांची स्मरणशक्ती या वयातही चांगली आहे. पहाटे पाचला उठणे, रात्री अकराला झोपणे, वृत्तपत्रे वाचणे, थोडेफार चालणे असा त्यांचा दिनक्रम असल्याचा त्यांचे चिरंजीव (निवृत्त सुभेदार) श्यामराव पडवळ यांनी नमूद केले.

''बाबांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. त्यांचा उत्साह कोैतुकास्पद आहे. ते आमचे निकटचे नातेवाईक आहेत, याचा आम्हांला निश्चितच अभिमान वाटतो."
- हेमंत निकम, अपशिंगे (मिलिटरी), हणमंत पडवळ यांचे नातेवाईक

Web Title: 107 years old voter in satara