Loksabha 2019 : सुरक्षेसाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे काही तास राहिले आहेत. मध्यप्रदेश राज्य राखीव पोलिस दलाचे पथक दाखल झाले आहे. स्थानिक आणि बाहेरून आलेल्या चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरात रुट मार्च सुरू असून मंगळवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बंदोबस्ताचे वाटप होणार आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे काही तास राहिले आहेत. मध्यप्रदेश राज्य राखीव पोलिस दलाचे पथक दाखल झाले आहे. स्थानिक आणि बाहेरून आलेल्या चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरात रुट मार्च सुरू असून मंगळवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बंदोबस्ताचे वाटप होणार आहे. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आजवर 386 ठिकाणी नाकांबदी करण्यात आली. यात नऊ हजार 500 वाहनांची तपासणी करण्यात आली. 783 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. हत्यार कायद्यानुसार दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान देगाव नाक्‍यावर जप्त केलेली 30 लाखांची रक्कम बॅंकेची असल्याचे आयकर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. दोन हजार 415 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, 23 जणांना तडीपार केले आहे. दारुबंदीचे 601 गुन्हे दाखल करून 647 जणांना अटक केली आहे. 23 लाख 48 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

शहरात 777 मतदान केंद्रे 
शहरात गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी 673 मतदान केंद्र होते, यावेळच्या निवडणुकीसाठी 777 मतदान केंद्र आहेत. 107 मतदान केंद्र वाढले आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील अधिक बंदोबस्त असेल शिवाय मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष असणार आहे. 

असा असेल पोलिस बंदोस्त.. 
एक पोलिस उपायुक्त, नऊ सहायक पोलिस आयुक्त, 12 पोलिस निरीक्षक, 70 सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, 350 पोलिस कर्मचारी, एक हजार 100 होमगार्ड, मध्यप्रदेश राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या असा बाहेरून बंदोबस्त आला आहे. पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, 14 पोलिस निरीक्षक, 50 सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, एक हजार 842 पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेसाठी बाहेरून आलेल्या पोलिसांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. विविध ठिकाणी पोलिसांच्या मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी, कोम्बींग ऑपरेशन सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांकडून सांगण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: 4 thousand police are appointed for loksabha election at Solapur