Loksabha 2019 : उल्हासनगरात 71 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त; आचारसंहिता पथकाची कारवाई

दिनेश गोगी
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- चार दिवसांतील चौथी कारवाई.

उल्हासनगर : उल्हासनगर येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांनी एका कारमधून तब्बल 71 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड पकडली. भदाणे यांच्या पथकाने चार दिवसात बेहिशेबी रोकड पकडण्याची चौथी कारवाई केल्याने उल्हासनगरचे आचारसंहिता पथक राज्यात 'सबसे तेज' ठरले आहे.

युवराज भदाणे यांनी कल्याणच्या दिशेकडून येणारी एमएच 46 डी 1737 ही कार शांतीनगर प्रवेशद्वारावर थांबवली. पोलिस गणेश राठोड, आचारसंहिता पथकाचे उदय वानखेडे यांच्या समक्ष कारची झाडाझडती घेतली असता त्यात एका लोखंडी पेटीत 100, 200, 500 व 2000 हजार रुपयांच्या नोटा अशी तब्बल 71 लाख रुपयांची बेहिशोबी रोकड मिळून आली. ही रोकड लॉर्जिकल कंपनीच्या एटीएमची असल्याचे ड्रायव्हर सांगत आहे. त्याच्याकडे एक चलन आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेचे ठोस पुरावे नसल्याने ही रोख रकम मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती युवराज भदाणे यांनी दिली.

एटीएमच्या नावाखाली रुपयांचा व्यवहार असण्याची शक्यता असून, हा प्रकार इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यात येणार आहे. या बेहिशोबी रोकडचा पोलिस तपास करत असल्याचे भदाणे यांनी सांगितले.

दरम्यान, युवराज भदाणे यांनी 20 तारखेला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास म्हारळ नाक्यावर अलब्रत नाडर यांच्या कारमधून 6 लाख 50 हजार रुपये त्याच रात्री 11 वाजता साईबाबा मंदिराजवळ वाईन शॉप असणारे व्यापारी रवी रायसिंघानी यांच्या कारमधून 5 लाख रुपये, 21 तारखेला म्हारळजवळ जुन्नर पुणे येथून येणारे व्यापारी राहुल आहुजा यांच्या कारमधून 4 लाख 10 हजार रुपये अशी बेहिशेबी रोकड पकडली.

आजची 71 लाख रुपयांची बेहिशोबी रोकड ही मोठी कारवाई असून, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: 71 Lakhs Cash Seized in Ulhasnagar action by Officers