Loksabha 2019 : अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मनोमिलनातून नवीन राजकिय पर्व सुरू

ajit-pawar
ajit-pawar

इंदापूर - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुणे निवासस्थानी काल (शुक्रवार) भेट घेतल्याने नवीन राजकिय पर्व सुरू झाले. बारामती लोकसभा मतदार संघात निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि मावळमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचाराचे नियोजन तसेच पुण्यातील आघाडीचा उमेदवारासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुळे यांनी मतदार संघातील 2100 गावांचा दौरा पुर्ण करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला असून, त्यांनी सहावेळा आदर्श संसदपटू असा पुरस्कार मिळवून आपली कर्तबगारी सिध्द केल्याने त्यांची स्थिती वरचढ आहे. मात्र लोकसभा झाली की विधानसभेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला साथ देत नसल्याने तीन तालुक्यात काँग्रेसमध्ये खदखद आहे. त्यातच पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी केलेला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याने तालुक्यात काँग्रेस प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत तीन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली आहे. 

यंदा पाटील यांनी सांगितले तरी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत न करण्याचा जाहिर निर्धार केला. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांचे काम चांगले असले तरी निर्वीवाद विजयाचे मतदान काँग्रेसच्या हातात असल्याने काँग्रेस मतांकडे दुर्लक्ष करून सौ. सुळे यांना चालणार नाही. 

शरद पवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, समविचारी पक्षांची महाआघाडी करून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारला आव्हान दिले. त्यातच मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ लोकसभेला उभे राहिल्याने पवार कुटुंबियाची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे शरद पवार यांना बारामतीतच जखडून ठेवण्यासाठी भाजपाने दौंडचे आमदार राहूल कुल यांची पत्नी कांचन यांना सौ. सुळे यांच्या विरोधात उतरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रकांतपाटील, पालकमंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी किंग मेकर म्हणून आपली ताकद सौ. कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे. मागील निवडणूकीत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी लक्षवेधी मते घेतली मात्र ते कमळाच्या चिन्हावर लढले नव्हते. 

मात्र सौ. कुल कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी बनली आहे. इंदापूर नगरपरिषदेसमोर झालेल्या जाहिर सभेत अजित पवार यांनी आघाडी तुटली तरी चालेल मात्र इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीची राहिल असा शब्द देवून भरणे यांना जाहिर पाठबळ दिले होते. त्यामुळे अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यातून विस्तव जात नाही अशी चर्चा होती. मात्र अजित पवार पाटील यांना भेटल्याने राजकारणात नवीन अध्याय सुरू झाला असून त्याचा फायदा लोकसभा, विधानसभा निवडणूकीत कोणाला होणार याची राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com