Loksabha 2019 : पश्‍चिम बंगालमध्ये आता सशस्त्र पोलिस दल तैनात

श्रीमंत माने
सोमवार, 6 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आता पाचव्या तसेच उरलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आता पाचव्या तसेच उरलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. जम्मू-काश्‍मीरनंतर आता पश्‍चिम बंगाल हे सशस्त्र पोलिसांच्या दुसऱ्या क्रमांकाचे, 578 कंपन्या तैनात असलेले राज्य बनले असून, ज्या सात मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होत आहे; त्या कोलकत्याला लागून असलेल्या जिल्ह्यांना छावणीचे स्वरूप आले आहे. 

पश्‍चिम बंगालचे मुख्य निवडणूक निरीक्षक अजय नाईक यांच्याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाने विवेक दुबे यांना विशेष पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दोन्ही निरीक्षकांनी शनिवारी (ता. 4) राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांसोबत मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. तेव्हा बराकपूर, हुगळी व बनगाव या तीन लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बराकपूर हा कोलकत्याच्या उत्तरेचा सैन्य छावणी असलेला संवेदनशील मतदारसंघ असून, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (तृणमूल) विरुद्ध ममता बॅनर्जींची साथ सोडून भाजपवासी झालेले अर्जुनसिंह यांच्यात मुख्य लढत आहे.

अनुसूचित जातींसाठी राखीव बनगाव या बांगलादेश सीमेला लागून असलेल्या मतदारसंघात तृणमूलच्या विद्यमान खासदार ममताबाला ठाकूर यांना त्यांचे पुतणे शंतनू ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर आव्हान दिले आहे. हुगळी मतदारसंघात तृणमूलच्या डॉ. रत्ना डे नाग यांची लढत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा लॉकेट चटर्जी यांच्याशी आहे. याशिवाय हावडा, उलबेरिया, श्रीरामपूर व आरामबाग (एससी राखीव) या अन्य चार मतदारसंघांमध्ये सोमवारी (ता. 6) मतदान होत आहे. 

अभूतपूर्व तैनाती

सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी अशा सशस्त्र पोलिस दलांच्या 578 कंपन्या, त्याशिवाय क्‍यूआरटीची दीडशेच्या आसपास पथके, अशी तैनाती यापूर्वी कोणत्याही राज्यात झालेली नाही. त्याचे कारण सांगितले जाते की, आधीच्या मतदानाच्या चार टप्प्यांमध्ये उसळलेला हिंसाचार, मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार, तिसऱ्या टप्प्यात गेलेला एक बळी, या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने वाढीव सशस्त्र बंदोबस्ताची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Armed police force is now deployed in West Bengal