Loksabha 2019 : "टार्गेट मोदी' : राज, प्रियांका आणि कन्हैय्या

Raj Thackeray Priyanka Gndhi Kanaiya kumar
Raj Thackeray Priyanka Gndhi Kanaiya kumar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमोघ वक्तृत्व जनमानसाची मनोभूमिका बदलणारे असले, तरी या निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे, बिहारमध्ये कन्हैय्याकुमार आणि उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या वक्तृत्वाचाही जनमानसावर प्रभाव पडू लागला आहे. "मोदी नको,' एवढीच भूमिका मांडताना, हे तिन्ही वक्‍ते त्यासाठी मतदारांना पटेल अशी कारणमिमांसा देतात. व्यासपीठावरून श्रोत्यांशी थेट संवाद साधत त्यांचा पाठिंबाही मिळवितात. पाच वर्षांपूर्वी मोदी यांची हीच शैली होती. याच शैलीने त्यांनी मतदारांना आकर्षित करीत खेचून घेतले होते. 

या तिन्ही वक्तांची वैशिष्ठेही एकमेकांपेक्षा भिन्न आहेत, तशीच विचारसरणीही भिन्न. देशात उजवी, डावी आणि पुरोगामी या मुख्य विचारधारा आहेत. या विचारधारांची अनेकदा सरमिसळ होते, मात्र मुख्यत्वे त्याभोवतीच देशाचे राजकारण फिरते. हे तिन्ही वक्ते यापैकी प्रत्येकी एका विचारधारेचे प्रतिनिधीत्व करतात. तिघांची वक्तृत्व शैलीही परस्परांशी भिन्न असली, तरी त्यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे "टार्गेट मोदी.' केंद्रात पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येताना कोणती आश्‍वासने दिली होती, या कालखंडात सरकारने काय केले, जनतेने कोणती भूमिका घेतली पाहिजे, यांवरच त्यांच्या भाषणांचा भर आहे. 

तिघेही वेगवेगळ्या राज्यात प्रचार करीत आहेत. ते कोणत्याही विशिष्ट पक्षांसाठी मतदान मागताना दिसून येत नाहीत. मात्र, सध्याचे केंद्र सरकार बदलले पाहिजे, असे ते आवर्जून सांगतात. गेल्या निवडणुकीत मोदी यांनी प्रचारात कॉंग्रेसवर हल्ले करून त्यांना नामोहरम केले होते. त्या हल्ल्याचा प्रतिवाद करण्यात विरोधकांचा वेळ जात होता. आताही मोदी हल्ला करून निघून जातात आणि विरोधक त्याला प्रत्युत्तर देत बसतात. हे तिन्ही नेते मात्र या सापळ्यात अडकत नाहीत. ते मोदी यांच्या कारभारावर थेट प्रश्‍न उपस्थित करतात, आणि सरकारने काम केले नाही, याकडे जनतेचे लक्ष वेधतात, हे प्रकर्षाने जाणवते. 

प्रियांका गांधी. कॉंग्रेसने पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली, अन्‌ त्यांनी प्रचार सुरू करण्यापूर्वीच भाजपच्या तोफा त्यांच्या दिशेने धडाडू लागल्या. लखनौमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीसोबत त्यांच्या रॅलीला मिळालेला जोरदार प्रतिसाद. साबरमतीला भेट दिल्यावरचे त्यांचे भाषण. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या फुलपूर मतदारसंघापासून पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापर्यंतचा गंगा नदीतून त्यांचा नौकेतून केलेला प्रचारदौरा. महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य लोकांशी संवाद साधताना त्या त्यांच्यातीलच होऊन जात असल्याचे जाणवते. अयोध्या, लखनौ, अमेठी येथेही त्यांचे दौरे गाजले. 

काशी विश्‍वनाथाचे दर्शन, गंगापूजन. हनुमानासह अन्य देवदेवतांची गांधी यांनी केलेली पूजा. "त्या पूर्वी कधी मंदिरात जात नव्हत्या,' या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हल्ल्यावर, "उनको क्‍या पता है, मैं मंदीर जाती हूँ या नही,' एवढेच त्यांचे उत्तर. अयोध्येत त्या राम मंदिरात काय गेल्या नाहीत, असा प्रश्‍न आदित्यनाथांनी उपस्थित केला. येथे ते प्रियांका यांच्या प्रचाराच्या सापळ्यात अडकले. हिंदुत्वाचा मुद्दा तेथे भाजपला किती उपयोगी पडेल, याचा प्रश्‍न निर्माण झाला. अयोध्येतील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडताना प्रियांका म्हणाल्या, ""येथे शेताला कुंपण घातल्याचे मला दिसून आले. जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी महिला दिवसभर, तर पुरुष रात्रभर शेतात चौकीदारी करतात. या प्रश्‍नाचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. टीशर्टवर मी चौकीदार असे लिहून समस्या सुटत नाहीत.'' गंगाकिनारी कोळी बांधवाच्या प्रश्‍नांना त्यांनी याच पद्धतीने फोडलेली वाचा. 

ठिकठिकाणी सर्वसामान्यांशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेत, तेथील छोटेखानी भाषणांत त्याचा उल्लेख करीत प्रियांका प्रचाराशी दिशा ठरवित आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांबाबत बोलतानाच तुमचे प्रश्‍न सुटले नाहीत, त्याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, निर्णय तुम्ही घ्या, असे आवाहन त्या करतात. "ही निवडणूक देशाच्या स्वातंत्र्याची आहे,' हा त्यांचा मुद्दा लोकांच्या मनाला स्पर्शून जातो. प्रियांका गांधी यांच्या भाषणात त्या कॉंग्रेसला मत मागताना दिसून येत नाही. त्यामुळे, तेथील भाजपच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांना त्याचा फायदा होईल हे निश्‍चित. 

कन्हैय्याकुमार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करीत कारवाई करण्याची भूमिका जाहीर केली, अन्‌ तीन वर्षांपूर्वी हा विद्यार्थी नेता एकदम देशपातळीवरच फेमस झाला. अमोघ वक्तृत्वाची, वादविवादात भाग घेताना श्रोत्यांना त्यांची मते मान्य करावी लागतील, अशा पद्धतीने मांडणी करण्याची हातोटी असलेला हा युवा नेता. डाव्या विचाराचा प्रचार करणारा. तो देशभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत फिरला. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (सीपीआय) बिहारमधील बेगुसरायमध्ये तो लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. राजप-कॉंग्रेसच्या महागठबंधनने त्याच्यासाठी ही जागा सोडली नाही. भाजपने केंद्रीयमंत्री गिरीराज यांना त्याच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र, लढत देताना, सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या, गरीबांची दुःखे मांडत तो मतदारांना आपलेसे करून घेत आहे. मुळात, त्याचे मुद्दे हे देशपातळीवरील समस्यांना वाचा फोडणारे, सर्वधर्मसमभावाची भूमिका विषद करणारे, केंद्र सरकारवर विशेषतः मोदी यांच्यावर थेट हल्ला करणारे आहेत. त्यामुळे, बिहारमध्ये सध्या त्याच्या मतदारसंघातील प्रचाराने लक्ष वेधून घेतले आहे. गिरीराज सारखे दिग्गज नेतेही त्याला तोंड देताना हतबल होऊ लागले आहेत. कन्हैय्याकुमार निवडून येईल की नाही, ते सांगता येणार नाही, मात्र प्रचारामध्ये तो मांडत असलेले मुद्दे खोडून काढणे भाजपच्या भल्या भल्या नेत्यांनाही जमत नसल्याचे दिसून येते. 

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. त्यामुळे ते स्वतःच्या पक्षाला मतेच मागत नाहीत. तरीदेखील गुढीपाडव्यापासून राज्यात त्यांच्या दहा सभा होणार आहेत. "मोदी आणि शहा' यांना विरोध एवढे एकच सूत्र ठेवून पुढील सभांत भाषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ठाकरे यांच्या वक्तृत्वाची तरुणाईवर छाप पडते. पुरावे देत आक्रमक शैलीत विरोधकांवर जोरदार हल्ला करणाऱ्या ठाकरे यांचे मुद्दे खोडून काढणे भल्याभल्यांना अवघड ठरते. महाराष्ट्रात एप्रिलमध्ये चार टप्प्यांत मतदान होणार आहे. कुंपणांवरील मतदार जेव्हा त्यांची मते निश्‍चित करण्याच्या भुमिकेत असतील, त्याचवेळी ठाकरी शैलीतील हल्ला परतविण्याची जबाबदारी सत्तारुढ पक्षांच्या नेत्यांवर येऊन पडणार आहे. 

या तिन्ही नेत्यांमुळे त्या त्या राज्यात मतदानाबाबत निर्णय घेताना सध्या कुंपणावर असलेल्या मतदारांना ते विचार करण्यास भाग पाडत आहेत. त्यांचे "टार्गेट मोदी' हे भाजपच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात फायदेशीर ठरणारे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com