आदर्श संसदपटूचे दर्शन घडवलेले शंकरराव माने

आदर्श संसदपटूचे दर्शन घडवलेले शंकरराव माने

स्वातंत्र्य लढ्यात ‘सरदार’ या नावाने त्यांची ओळख होती. त्यांनी या नावाला साजेसे असेच काम स्वातंत्र्य चळवळीत केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (शिवाजी चौक) असलेला ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा फोडण्यात त्यांचे नेतृत्व होते. ब्रिटिश खजिन्याची लूट करण्यात त्यांचा पुढाकार होता. या कृत्याबद्दल एक-दोन दिवस नव्हे, तब्बल दोन महिने दिल्लीत लाल किल्ल्यावरील तुरुंगवास त्यांना भोगावा लागला होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्यक्ष घरादारावर तुळशीपत्र ठेवून सहभागी झालेला हा माणूस १९६७ मध्ये कोल्हापूरचा खासदार झाला आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्यावर कोल्हापूरकरांनी मुकुट चढवला. 

शंकरराव माने हे या खासदारांचे नाव. व्ही. टी. पाटील यांच्यानंतर कोल्हापूर लोकसभेवर दोन वेळा प्रतिनिधित्व करून माने यांनी एक आदर्श संसदपटू कसा असावा, याचे दर्शन घडवले. १९५७ पर्यंत अपक्ष व शेतकरी कामगार पक्षाचेच वर्चस्व होते. १९६२ मध्ये व्ही. टी. पाटील यांनी हे वर्चस्व रोखले. पुढे शंकरराव माने यांनी कोल्हापूरच्या खासदारकीवर काँग्रेस पक्षाचा शिक्का उमटवला.

१९६७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सावंतवाडीचा समावेश होता. कोल्हापूर शहर, करवीर, कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा व सावंतवाडी अशी या मतदारसंघाची रचना होती. या मतदारसंघात काँग्रेसने शंकरराव माने यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात होते शेतकरी कामगार पक्षाचे डी. एस. नार्वेकर गुरुजी व आर. आर. यादव हे स्वतंत्र उमेदवार. १९६७ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित झाली होती. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता गुंतून गेला होता. तगडा उमेदवार विरोधात असल्याने काँग्रेसला प्रचार करताना घराघरांत पोचावे लागले व या निवडणुकीत एक लाख ५८ हजार ३२७ मते मिळवून शंकरराव माने विजयी झाले. डी. एस. नार्वेकर यांना एक लाख २५ हजार ६१७ मते मिळाली.

१९६९ च्या काँग्रेस फुटीच्या वेळी श्री. माने इंदिरा गांधी यांच्या बाजूने ठामपणे राहिले. १९७२ ते ७७ या काळात भारत सरकारच्या अनुसूचित जाती व जमाती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. १९५२ ते १९८२ या कालावधीत ते स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरव समितीवर होते. त्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन व इतर लाभ मिळवून दिले. खासदार या पदाचा मान आणि शान जपण्याचे एक तंत्र त्यांनी अवलंबले. खासदार या व्यक्तीने किती स्वस्त होऊ नये, याचेच दर्शन त्यांनी कृतीतून दाखवून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com