Loksabha 2019 : घटनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

राज्यघटनेचा सन्मान राखला जात नसून त्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला.

सिलचर (आसाम) : राज्यघटनेचा सन्मान राखला जात नसून त्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला.

सिलचर येथे कॉंग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुष्मिता देव यांच्या समर्थनार्थ आज प्रियांका गांधी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रियांका म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात फिरले; परंतु त्यांनी आपला मतदारसंघ वाराणसी येथे क्वचितच दौरा केला. वाराणसीच्या जनतेनेदेखील या संदर्भात आपल्याकडे तक्रारी केल्या असून, मोदी यांनी पाच मिनिटेदेखील वेळ मतदारसंघासाठी दिला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ते अमेरिकेला गेले आणि लोकांच्या गळाभेटी घेतल्या.

चीनला गेले आणि तेथेही लोकांना भेटले. रशिया, आफ्रिकेत जाऊन भेटीगाठी घेतल्या. जपानमध्ये ड्रम वाजवला, तर पाकिस्तानमध्ये बिर्याणी खाल्ली. मात्र आपल्याच मतदारसंघातील कोणत्याही कुटुंबाची भेट घेतली नाही की चौकशी केली नाही. या वेळी त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

Web Title: An attempt to Finish Existence of constitution says Priyanka Gandhi