Loksabha 2019 :  टक्का वाढविण्यासाठी नेत्यांचा आटापिटा

Loksabha 2019 :  टक्का वाढविण्यासाठी नेत्यांचा आटापिटा

पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. पुण्यात खूपच कमी मतदान झाले. त्याची पुनरावृत्ती मावळ व शिरूरमध्ये होऊ नये व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे. या संदर्भात आपापले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक महायुतीने पिंपरीत, तर महाआघाडीने काळभोरनगरमध्ये घेतली. त्यात मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नेत्यांनी केले.

महिलांचा टक्‍का वाढवा - वाघ
‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी व नगरसेविकांनी आपापल्या परिसरातील नागरिकांशी संपर्क साधावा. मतदानात महिलांचा टक्‍का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

महाआघाडीच्या प्रमुख महिला कार्यकर्त्यांची बैठक काळभोरनगर येथील मुख्य कार्यालयात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरिजा कुदळे उपस्थित होत्या. 

वाघ म्हणाल्या, ‘‘परिसरातील मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करा. आपला परिसर सोडून इतर ठिकाणी प्रचाराकरिता जाऊ नका. प्रचार करताना गेल्या पाच वर्षांत वाढलेली महागाई, महिलांवरील अत्याचारांत झालेली वाढ, बेरोजगारीने गाठलेला उच्चांक इत्यादी मुद्यांवर भर द्यावा.’’

मुद्दे नसल्याने छायाचित्र व्हायरल  
‘राष्ट्रवादी’च्या उमेदवाराच्या व्यक्तिगत आयुष्यातील छायाचित्र शिवसेनेने व्हायरल केले आहे. आदित्य ठाकरे यांचे त्यापेक्षाही आक्षेपार्ह छायाचित्र आमच्याकडे आहे. गेल्या पाच वर्षांत काहीच काम केले नसल्याने शिवसेनेकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते अशी छायाचित्रे व्हायरल करीत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

मतदानाचे ऑडिट करू - बापट
म तदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून दिली आहे. ज्या भागात मतदान कमी होईल, त्याचे ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री व पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. पिंपरीतील खासगी हॉटेलमध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह अन्य मित्र पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक बापट यांनी घेतली. आजपर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा घेऊन त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘मावळ मतदारसंघातील सर्व भागात प्रचार फेऱ्या, रोड शो, कोपरा सभा पूर्ण झाल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आठ हजार कार्यकर्ते काम करीत आहेत. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आहे.’’

वैचारिक पातळी उंच  
महाआघाडीच्या उमेदवाराच्या व्हायरल छायाचित्राशी आमचा काहीही संबंध नाही. कोणी काय करावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची वैचारिक पातळी उंच आहे. इतक्‍या खालच्या स्तराला आम्ही जात नाही. भविष्यातही जाणार नाही, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com