Loksabha 2019 : मतदानाच्या दिवशी जाहिरातींवर बंदी

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

- निवडणूक आयोगाच्या छाननी समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय राजकीय जाहिराती प्रसिद्धीस मनाई

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या छाननी समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यास सर्व उमेदवार, राजकीय पक्ष आणि इतरांना मनाई करण्यात आली. हा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना असलेल्या घटनात्मक अधिकाराचा वापर केला आहे.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यांसाठी लागू असेल. निवडणुकीच्या दिवशी आणि त्याआधीच्या दिवशी राजकीय जाहिरातींवर सरसकट बंदी घालण्याचा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे अद्याप प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने 2015 मध्ये बिहारमधील निवडणुकीवेळी असा निर्णय सर्वप्रथम घेतला होता. "वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये मतदारांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत.

अखेरच्या काळात प्रसिद्ध होणाऱ्या अशा जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होतो आणि त्याचा तोटा सहन करावा लागलेल्या उमेदवाराला आणि पक्षाला दुसरी संधी मिळत नाही,' असे आयोगाने म्हटले आहे. 

Web Title: Ban on Political Advertisements on the Day of Voting