कोल्हापूरचे पहिले खासदार कोण?....जाणून घ्या

सुधाकर काशीद
Friday, 8 March 2019

अशी होती मतदान प्रक्रिया
पहिल्या लोकसभेसाठी मतपत्रिकेवर शिक्का नव्हता. उमेदवाराचे चिन्ह असलेले बॉक्‍स मतदान केंद्रात ठेवले जात होते. मतदाराने आपली मतपत्रिका त्याला पाहिजे त्या उमेदवाराचे चिन्ह असलेल्या बॉक्‍समध्ये टाकायची पद्धत होती.

कोल्हापूर - भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ सालची पहिली लोकसभा निवडणूक झाली. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य चळवळीपासूनच राजकीयदृष्ट्या धगधगता. स्वातंत्र्यचळवळीतही काँग्रेस चक्क दोन गटांत विभागलेली. या परिस्थितीत पहिली निवडणूक जाहीर झाली.

अर्थातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य चळवळीतले नेते रत्नाप्पा कुंभार यांचे नाव पुढे आले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वसाधारण व राखीव अशा लोकसभेच्या दोन जागा. दुसऱ्या जागेसाठी के. एल. मोरे यांचे नाव पुढे आले. रत्नाप्पा अण्णांच्या विरोधात कोण हा प्रश्‍न साहजिकच उभा राहिला.

समाजवादी पक्षाने ॲड. वसंतराव बागल यांची उमेदवारी जाहीर केली आणि अशा परिस्थितीत एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. हे अपक्ष उमेदवार म्हणजे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर. अनेक राजकीय अभ्यासकांना वाटले, हे खर्डेकर असतील बॅरिस्टर; पण राजकारणात आणि तेही निवडणुकीच्या राजकारणात हे कसे काय टिकणार?

निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. रत्नाप्पा कुंभार, वसंतराव बागल व बॅरिस्टर खर्डेकर अशी तिरंगी लढत. रत्नाप्पा कुंभार म्हणजे स्वातंत्र्यचळवळीतले नेते. राज्यघटनेवर त्यांची सही. याशिवाय काँग्रेसची त्यांच्या मागे असलेली ताकद; यांमुळे रत्नाप्पा कुंभार म्हणजे हमखास विजयाची सीट, असे चित्र निर्माण केले गेले; पण अपक्ष उमेदवार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी हळूहळू प्रचारात आपला वेगळा प्रभाव निर्माण केला.

बॅरिस्टरसारखी पदवी, कोट, पॅंट, बुट, टाय, तोंडात चिरूट असा भारदस्त पेहराव. इंग्रजी व मराठीवर प्रभुत्व आणि इतके भारदस्त व्यक्तिमत्त्व असतानाही लोकांत सहज मिसळून जाण्याचे कसब; यामुळे खर्डेकर सर्व थरांत जाऊन पोहोचले. 
जिल्हा काँग्रेसमध्ये त्यावेळेपासून गटबाजी. त्यामुळे रत्नाप्पा कुंभार विरोधकांनी खर्डेकरांच्या बाजूने छुपे काम सुरू केले.

याशिवाय वसंतराव बागल हे समाजवादी पक्षाचे तिसरे उमेदवार. ते कोल्हापूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यामागे माधवराव बागल होते. त्यामुळे वसंतराव बागल काँग्रेसची काही मते खाणार हे स्पष्ट होते आणि तसेच झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या कोल्हापुरात पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रत्नाप्पा कुंभार यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी दोन लाख २२ हजार ८६४ मते मिळवून कोल्हापूरचा पहिला आणि तोही अपक्ष खासदार म्हणून मान मिळवला. 

रत्नाप्पा कुंभार यांना १ लाख ६३ हजार ४१९ मते व तिसरे उमेदवार वसंतराव बागल यांना ६१ हजार १२८ मते मिळाली. 
या निवडणुकीत बॅरिस्टर खर्डेकर विजयी झाले; पण त्यांनी अपक्ष म्हणून पहिल्या लोकसभेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. खर्डेकर कोल्हापूरच्या सरदार घराण्यातील. त्याकाळी एखाद्या संपन्न घराण्यात असूनही त्यांनी शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. परदेशात शिकले. बॅरिस्टर झाले. राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले.

ते एवढ्या शिस्तीचे होते, की एकदा कॉलेजमध्ये निमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या व्याख्याना वेळी मुलांनी कॉमेंटस्‌ केल्या, हुल्लडबाजी केली. खर्डेकरांनी या घटनेत सहभागी असलेल्या मुलांना स्वतःहून चूक कबूल करण्याची संधी दिली; पण ती मुले पुढे आली नाहीत. खर्डेकर यांनी त्याक्षणी आपल्या चांगुलपणाला ही मुले दाद देत नाहीत; तर आपला चांगुलपणा काय कामाचा, या भावनेने प्राचार्यपदाचाच राजीनामा दिला. राजीनामा देऊन ते रेल्वेने बेळगावला निघाले. तेव्हा इतर असंख्य मुलांनी मिरज रेल्वेस्थानकावर जाऊन त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. 

बॅरिस्टर खर्डेकर यांनी लोकसभा आपल्या इंग्रजीतील भाषणाने गाजवली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करत. खर्डेकरांना काँग्रेस पक्षात घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री करण्याचाही प्रस्ताव होता; पण खर्डेकरांनी तो नम्रपणे नाकारला. त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. कागलमध्ये कॉलेज काढले व तेच कॉलेज पुढे गोपाल कृष्ण गोखले कॉलेज म्हणून कोल्हापुरात आणले. त्यांनी या कॉलेजच्या माध्यमातून कोल्हापुरात महाविद्यालयीन शिक्षणाची दारे खुली केली. शिवाजी विद्यापीठ स्थापनेपूर्वी नेमलेल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. 

कागलमध्ये जयसिंग तलावाच्या काठावर एका कौलारू बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते. ते पट्टीचे शिकारीही होते. त्यांचा बंगला पुस्तकांनी भरलेला होता. खर्डेकर खासदार होते; पण राजकारणात नव्हते. अखेरच्या काळात त्यांना रक्तदाब व निद्रानाशाचा विकार जडला. नेहमी आपल्या खानदानी ऐटीत असलेला हा माणूस या आजारामुळे मात्र खचला व २६ डिसेंबर १९६३ रोजी कोल्हापूरच्या या पहिल्या खासदाराने बंदुकीची गोळी स्वतःच्या डोक्‍यात मारून घेऊन जीवनप्रवास संपवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: barrister Khardekar first MP of Kolhapur