Loksabha 2019 : राज यांच्या सभांमुळे भाजपच्या पोटात गोळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

सभांचा खर्च मनसेच्या खात्यात

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार राज ठाकरे यांच्या प्रचार सभांचा खर्च मनसे पक्षाच्या खात्यात जमा करण्याची कायद्यात तरतूद असल्याचे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावल्यामुळे भाजपच्या पोटात गोळा उठला आहे. राज यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार? अशी विचारणा भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी काल नांदेड येथे सभा घेतली. ""मी निवडणूक लढणार नाही. मात्र, मोदी-शहा यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहे. याचा राजकीय फायदा कुणालाही झाला तरी चालेल. मात्र, भाजप सरकारचा पराभव झाला पाहिजे,'' असे त्यांनी सभांमधून सांगण्यास सुरवात केली आहे. मात्र, मतदारांनी कुणाला मते द्यावीत, असे सांगण्यास राज ठाकरे यांनी टाळल्याने भाजप नेते बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर भाजपने आता टीका करण्यास सुरवात केली आहे. विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेत आहेत.

मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. 

राज यांचा प्रचार प्रत्यक्षपणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवीत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला पाहिजे, ही बाब स्पष्ट होत नाही, असे तावडे यांनी पत्रात म्हटले आहे. राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे.

राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे, की त्याठिकाणच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

सभांचा खर्च मनसेच्या खात्यात

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार राज ठाकरे यांच्या प्रचार सभांचा खर्च मनसे पक्षाच्या खात्यात जमा करण्याची कायद्यात तरतूद असल्याचे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये असून, राजकीय पक्षाला अशी मर्यादा नाही. पक्षाच्या खात्यात कितीही खर्च दाखविता येतो, असे आयोगाचे म्हणणे आहे. मनसेचे उमेदवार निवडणूक लढवितात किंवा नाही, याच्याशी आयोगाचा संबंध नाही. मात्र, प्रचार सभा पक्षाच्या नावाने होत असल्यास तो खर्च पक्षाच्या खात्यात ग्राह्य धरण्याची कायद्यात तरतूद असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. 

Web Title: BJP is Afraid Due To Rally of Raj Thackeray