Loksabha 2019 : नंदुरबारमध्ये समिधामुळे वाढणार हिनांच्या अडचणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

नंदुरबार : तत्कालिन धुळे लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयंत नटावदकर यांची नात आणि जिल्ह्यात भाजप रूजविण्यासाठी पदरमोड करणारे डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा यांनी आज नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज घेतल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे नक्की असल्याचे मानले जात आहे. भाजपची उमेदवारी डॉ. हिना गावित यांना जाहीर झालेली असताना डॉ. समिधा यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने डॉ. गावित यांच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींनी जिल्हयाचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 

नंदुरबार : तत्कालिन धुळे लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयंत नटावदकर यांची नात आणि जिल्ह्यात भाजप रूजविण्यासाठी पदरमोड करणारे डॉ. सुहास नटावदकर यांची कन्या डॉ. समिधा यांनी आज नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज घेतल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे नक्की असल्याचे मानले जात आहे. भाजपची उमेदवारी डॉ. हिना गावित यांना जाहीर झालेली असताना डॉ. समिधा यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने डॉ. गावित यांच्या अडचणी वाढणार असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींनी जिल्हयाचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास सुरवात झाली. आज पहिल्याच दिवशी डॉ. समिधा सुहास नटावदकर यांनी चार उमेदवारी अर्ज स्वतः जाऊन घेतले. त्यांच्या या कृतिने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जणू भूकंपाचे राजकीय तरंगच उमटले. भाजपची उमेदवारी डॉ.समिधा यांना मिळणार असल्याचे संकेत त्यांना पक्षाकडून प्राप्त झाल्यानेच त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत, इथपासून ते त्यांचे वडिल डॉ. सुहास नटावदकर यांना भाजपच्या वरिष्ठांनी बोलविले असून याबाबत तत्काळ निर्णय होऊन उमेदवारी दिली जाणार आहे अशा एकनाअनेक चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कॉंग्रेसमधील नाराजी नाट्य संपत नाही तोच भाजपमध्येही बंडखोरीचे, निष्ठांवतांचे नवे नाट्य सुरू होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. 

याबाबत डॉ. समिधा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,‘आमचे घराणे अगदी स्वातंत्र्यापासून राजकारणात आहे. माझे आजोबा जयंतराव नटावदकर आमदार आणि नंतर तत्कालिन धुळे मतदारसंघाचे पहिले खासदार होते. माझ्या वडिलांनीही दोनदा निवडणूक लढविली आहे. माझ्या कुटूंबाचे भाजपशी असलेले नाते आणि बालपणापासूनच राजकारणाच्या परिघात वावरत आसल्याने मलाही राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करायची आहे. मी स्वतः डॉक्टर असून आदिवासी जनतेच्या सेवेची संधी या माध्यमातून मिळवायची इच्छा आहे, पक्षाने त्याचा विचार करावा. माझ्या वडिलांचा दोनदा निसटता पराभव झाला असतानाही आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, जिल्ह्यात भाजपच्या वाढीसाठी आमच्या परिवाराने दिलेले योगदान सवर्श्रृत आहे, प्रसंगी पदरमोड करून कुटूंबाने भाजपसाठी योगदान दिले आहे, त्यामुळे यावेळी पक्ष माझ्या उमेदवारीबाबत नक्की विचार करेल अशी मला आशा आहे. 

डॉ. समिधा यांच्या उमेदवारीने भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या अडचणीत भर पडणार असून भाजप डॉ. समिधांच्या आवाहनाला काय प्रतिसाद देते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. डॉ. समिधा किंवा सुहास नटावदकर यापैकी कुणीही अपक्ष निवडणूक लढवू शकतात असेही राजकी जाणकार सांगत आहेत. त्यामुळे याचा फटका भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावितांना बसू शकतो. दरम्यान डॉ. नटावदकर यांच्याशी संपकर् साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही, ते बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. 

संपूर्ण कुटूंबच भाजपशी एकनिष्ठ 
नटावदकर कुटूंब भाजपशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे. जयंतराव नटावदकर पहिले आमदार आणि खासदार होते. सुहास नटावदकर यांनी 2004 आणि 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली आहे. मात्र त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता, मात्र ते पक्षाशी एकनिष्ठच राहिले आहेत. भाजपचे दिवंगत सरचिटणीस प्रमोद महाजन आणि तत्कालिन संघाचे पदाधिकारी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नटावदकर कुटूंबियांशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. डॉ. समिधा या एमबीबीएस असून त्या व्हॉलीबॉलच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. पहिल्यापासून हुशार असलेल्या डॉ. समिधा सध्या पदव्युत्तर शिक्षणाकडे वळल्या आहेत. 

Web Title: BJP candidate Heena Gavit will face barrier due to Samidha Natavadkar