Loksabha 2019 : आठवले, जानकर यांना लागली आस

Loksabha 2019 : आठवले, जानकर यांना लागली आस

भाजपने २०१४ ची लोकसभा निवडणूक पार पडल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती तोडली. यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आणि ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे हे भाजपच्या वळचणीला गेले. ‘स्वाभिमानी’त फूट पडून शेट्टी बाहेर पडले; मात्र सदाभाऊ खोत आमदार, मंत्री झाले आणि भाजपलाच चिकटून राहिले. जानकर कॅबिनेट मंत्री झाले. आठवले राज्यसभा आणि नंतर केंद्रात राज्यमंत्री झाले. मेटेंना शिवस्मारक समितीचे प्रमुख करण्यात आलेय. हे घटक पक्ष सध्या भाजपवर भलतेच नाराज आहेत. शिवसेनेबरोबर युती करताना भाजपने आपणास विश्‍वासात घेतले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मागच्यावेळेस बारामतीतून लढलेले जानकर यंदा माढ्यातून लढण्याची भाषा करताहेत. त्यांना लोकसभेचे तिकीट हवेय. मात्र भाजप जानकरांना बारामती अथवा माढा अशा कोणत्याच ठिकाणी तिकीट देणार नाही, त्यामुळे नाराज घटक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. त्यांनी पुण्यात शेट्टी यांची भेट घेतली. मात्र, चौथी आघाडी करण्याचा जानकरांचा विचार त्यांना काही पटला नसल्याचे दिसते. त्यांनी चक्‍क नकार दिला आहे. त्यामुळे हात चोळत गप्प बसण्याशिवाय जानकर यांच्याकडे पर्याय नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

रामदास आठवले जाहीर भाषणांतून, पत्रकार परिषदांमधून ‘मी निवडणूक लढवणार, मला शिवसेना- भाजपने जागा सोडावी,’ अशी आर्जवं करताहेत. मात्र त्यांच्याकडे भाजपश्रेष्ठींचा काणाडोळा होतोय. मुंबईतील शिवसेनेच्या वाट्याची दक्षिण मध्य किंवा भाजपकडील ईशान्य मुंबई यांपैकी एक जागा ते मागत आहेत. आठवले यांना यापैकी कोणतीही जागा मिळणे अवघड दिसतेय. त्यामुळे आठवले जाहीर नाराजी व्यक्‍त करत आहेत. तरीही मूग गिळून गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नाही. रयत क्रांती संघटना काढून शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला शह देण्याचा प्रयत्न करणारे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना हातकणंगल्यात शेट्टींच्या विरोधात लोकसभा लढवावी, असे वाटत आहे. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे, त्यामुळे खोत यांनी सध्या ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी भूमिका घेतली आहे; तर मेटे यांना लोकसभेत रस नाही, त्यामुळे ते सध्या शांत आहेत. भाजपच्या घटक पक्षांना लोकसभेची एकही जागा दिली जाणार नाही, असे भाजपकडून सांगण्यात येतेय. त्यामुळे आठवले, जानकर यांना काहीच करता येत नाही, अशी स्थिती आहे.

आप, बसप यांची स्वतंत्र चाल
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीबरोबर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. २२ जागांवर उमेदवारी दिली. स्वतंत्र ४८ जागांवर उमेदवार ‘एमआयएम’ या पक्षाच्या सोबत देण्याचं या आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केलंय. याप्रमाणे कोणत्याही पक्षासोबत कसलीही चर्चा न करता आम आदमी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष यांनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्ष किमान १५ जागांची घोषणा करणार आहे. राज्यातील ‘आप’चे पदाधिकारी दिल्ली येथे पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला गेले आहेत. त्यानंतर ‘आप’च्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे, तर बसप राज्यात ४८ जागा लढवणार आहे. ‘बसप’ची विदर्भात ताकद आहे. नागपूर, भंडारा- गोंदिया, बुलडाणा, अमरावती इत्यादी जिल्ह्यांत लक्षणीय ताकद आहे. तसेच, राज्यातील ४८ मतदारसंघांत ‘बसप’ची केडरबेस मतपेढी आहे. विदर्भात ‘बसप’चे उमेदवार विजयाची गणितं बिघडवू शकतात. मात्र, ‘बसप’ला युती अथवा आघाडी करायची नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबरची युती वगळता बसप इतर राज्यांत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. काँग्रेसने ‘बसप’बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आलेले नाही. त्यामुळे या पक्षांचा एकला चलो रेचा पुकारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com