Loksabha 2019 : भाजपची देशभक्तीची नवी व्याख्या : सोनिया गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 एप्रिल 2019

- सध्याच्या काळात देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जातेय

- मोदी सरकारला असहमती मान्य नाही.

नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून, देशातली विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरवले जात आहे, असा हल्ला "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधींनी यांनी आज चढवला. मोदी सरकारला असहमती मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी जनतेसमोर लोकसभा निवडणुकीसाठी "जनसरकार अजेंडा-2019' आज सादर केला. या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या. या कार्यक्रमात माकपचे निलोत्पल बसू, भाकपचे डी. राजा, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी आदी सहभागी झाले होते. निवडणूक प्रचारापासून लांब राहिलेल्या सोनिया गांधींनी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून भाजप सरकारला धारेवर धरताना, या सरकारला असहमती मान्य नसल्याचा आरोप केला.

"आता तर देशभक्तीची नवी व्याख्या शिकवणे सुरू झाली आहे. विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरविले जात आहे. देशाच्या आत्म्यावर सुनियोजित पद्धतीने हल्ला केला जात असून, ही चिंतेची बाब आहे. धर्म आणि विचासरणीच्या आधारे आपल्याच नागरिकांशी भेदभाव केला जात आहे. आहारविहार, पोषाख, भाषा, तसेच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्‌द्‌यांवर काही लोकांची दडपशाही सहन करण्याची अपेक्षा आपल्याकडून केली जात आहे. सध्याचे सरकार मात्र कायद्याचे पालन करण्याचे कर्तव्य पार पाडण्यास तयार नाही,'' अशी तोफ डागताना सोनिया गांधींनी कॉंग्रेसची सत्ता आल्यास दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याची स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येईल, असेही सांगितले. 

सोनिया म्हणाल्या... 

- ज्या संस्थांनी यशोशिखरावर नेले त्या संस्था संपविल्या जात आहेत 
- सर्वसमावेशकता नष्ट करण्यात सरकारने कसर ठेवलेली नाही 
- श्रद्धेवर ठाम असणाऱ्यांवर हल्ले होत आहेत 

Web Title: BJP Introducing new Defination of Patriotism says Sonia Gandhi