Loksabha 2019 : बारामतीत कमळ कोणाच्या हातात; उमेदवारच सापडेना

bjp
bjp

बारामती : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आठवडाभरावर येऊन ठेपलेली असतानाही बारामतीत भाजपचा उमेदवार नेमका कोण हेच ठरत नसल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पुण्यात या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने आता पुन्हा ही घोषणा लांबणीवर पडली आहे.

दुसरीकडे लवकर नावाची घोषणा झाली तर कार्यकर्त्यांना प्रचाराला पुरेसा अवधी तरी मिळू शकतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. उमेदवारच माहिती नसल्याने प्रचार तरी कोणाचा करायचा असा संभ्रम भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने प्रचाराची जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून बारामती शहर व तालुक्यात गावभेटी व संपर्क दौऱ्यांचे नियोजन पूर्ण झाले आहे. इतकेच नव्हे तर नगरपालिका व पंचायत समिती जिल्हा परिषद गटगणनिहाय प्रचारही सुरु झाला आहे.  

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल अशा उमेदवाराच्या शोधात भाजप असून त्यासाठीच हा प्रदीर्घ खल सुरु असल्याचे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. 
या लोकसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुखांच्या भावना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जाणून घेतल्या असून योग्य उमेदवार दिला जाईल, असा संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात आला आहे. 

रंजना कुल यांच्या नावाबाबत अंतिम सहमती होण्याची शक्यता असली तरी आज पुन्हा एकदा राहुल कुल व त्यांच्या पत्नी कांचन कुल यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. कुल कुटुंबियांनी नकार दिला तर भीमराव तापकीर किंवा बाळासाहेब गावडे यांना मैदानात उतरविण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरु आहेत. संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. स्वताः मुख्यमंत्र्यांनीच बारामती जिंकण्याची घोषणा केलेली असल्याने ही लढत भाजपच्या दृष्टीनेही आता प्रतिष्ठेची बनली आहे. 

राष्ट्रीय स्तरावरील लक्षवेधी लढत
खासदार सुप्रिया सुळे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीकडे राष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी म्हणून पाहिले जात आहे. केवळ राजकीय स्तरावरच नाही तर माध्यमांच्या स्तरावरही बारामतीची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची समजली जाते. भाजपाकडूनही त्या दृष्टीनेच तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी सध्या सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com