Loksabha 2019 : नाशिकचे उमेदवार श्रीरामचरणी लीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

श्रीराम जन्मोत्सवप्रसंगी विद्यमान खासदार व भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी खासदार व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ व अपक्ष उमेदवार ऍड. माणिकराव कोकाटे यांनी श्रीरामांच्या चरणी लीन होत विजयासाठी साकडे घातले.

नाशिक : श्रीराम जन्मोत्सवप्रसंगी विद्यमान खासदार व भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी खासदार व कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ व अपक्ष उमेदवार ऍड. माणिकराव कोकाटे यांनी श्रीरामांच्या चरणी लीन होत विजयासाठी साकडे घातले. या वेळी तिन्ही उमेदवारांचा ट्रस्टतर्फे हार, श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे काढलेले छायाचित्र थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल करत विजयाचे दावेही सुरू केले.

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासाठी आज भाविकांची गर्दी उसळली होती. लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने निवडणुकीत विजयश्री प्राप्त व्हावी, म्हणून आज युती, आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी श्रीरामाला विजयासाठी साकडे घातले. या वेळी तिन्ही उमेदवार प्रथमच एकत्र आल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे या तिघांनी एकत्रित फोटोसेशनही केले. 

देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना बळ मिळावे, येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस व्हावा, यासह राज्यातील सर्व 48 जागा महायुतीला मिळून केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे, यासाठी साकडे घातले. 

- हेमंत गोडसे, महायुतीचे उमेदवार 

देवाकडे प्रार्थना करून राज्यातील दुष्काळ, युवकांच्या हाताला काम मिळावे, हा देश पुन्हा एकदा सुजलाम्‌ सुफलाम्‌ करावा, असे मागणे मागितले. देवाकडे स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी मागितले. 

- समीर भुजबळ, महाआघाडीचे उमेदवार 

मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी श्रीरामाला साकडे घातले. 

- माणिकराव कोकाटे, अपक्ष उमेदवार 

Web Title: Candidates of Nashik Takes Darshan of Lord Shriram