Loksabha2019 : 'राष्ट्रवादी'चे कॅप्टन फलंदाजीला उतरले; अचानक 'बारावा खेळाडू' झाले! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

'यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने वातावरण आहे. या सामन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्णधार सलामीला फलंदाज म्हणून उतरले आणि सात दिवसांतच 'बारावा खेळाडू' म्हणून सामन्यातून बाहेर पडले', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

नगर : 'यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने वातावरण आहे. या सामन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्णधार सलामीला फलंदाज म्हणून उतरले आणि सात दिवसांतच 'बारावा खेळाडू' म्हणून सामन्यातून बाहेर पडले', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत फडणवीस यांनी पाच मिनिटांच्या भाषणात जोरदार बॅटिंग केली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. आजच्या या गर्दीने त्या सभेचा विक्रमही मोडला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या त्या सभेमुळे नगर आणि शिर्डी या दोन्ही जागांवर भाजपचा विजय झाला होता. आजची गर्दी पाहता 2019 मध्येही त्याच निकालाची पुनरावृत्ती होणार आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन 'बारावा खेळाडू' होत असताना भाजपने मात्र तरुण फलंदाज खेळपट्टीवर उतवला आहे. विखे पाटील या भागाचे नेतृत्त्व सक्षमरित्या करू शकतील. विखे पाटील यांच्या रुपाने भाजपने एक 'सर्जिकल स्ट्राईक' केला आणि विरोधी पक्षांना हादरवले. आता निकालामध्येही हेच चित्र दिसेल.'' 

फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ''मी नरेंद्र मोदी यांच्यासारखा दिसतो का?' असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी त्यांच्या मित्रांना विचारला. तसे नसेल, तर माझ्या प्रत्येक सभेत लोक 'मोदी-मोदी' अशा घोषणा का देतात' असा प्रश्‍न राहुल यांना पडला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Web Title: Chief minister Devendra Fadnavis criticized NCP at Nagar rally