Loksabha 2019 : 'ऑपरेशन कमळ'विरोधात  कॉंग्रेस-धजदचा मास्टर प्लॅन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

लोकसभा निवडणुकीनंतर 'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून राज्यातील युती सरकार अस्थिर करण्याची भाजपची योजना हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेस- धजदने मास्टर प्लॅन आखला आहे.

बंगळूर : लोकसभा निवडणुकीनंतर 'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून राज्यातील युती सरकार अस्थिर करण्याची भाजपची योजना हाणून पाडण्यासाठी कॉंग्रेस- धजदने मास्टर प्लॅन आखला आहे. रविवारी (ता. 28) एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्‍त बैठकीत यावर प्रदीर्घ चर्चा झाली. चिंचोळी व कुंदगोळ विधानसभा पोटनिवडणुकीची रणनीतीही या वेळी ठरविली. 

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, कॉंग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव, प्रियांक खर्गे आदी या वेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर झालेली दोन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त बैठक होती. आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतच प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. 

आघाडी सरकारचे पतन करण्यासाठी भाजपने पुन्हा हालचाली गतिमान केल्या आहेत. चिंचोळीचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता रमेश जारकीहोळी यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने कॉंग्रेसमध्ये अजून काहीजण असंतुष्ट आहेत. कित्येक जण ज्येष्ठ असूनही संधी मिळाली नसल्याने नाराज आहेत. नाराजीचा फायदा घेऊन त्यांना "ऑपरेशन कमळ'च्या जाळ्यात अडकविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 
उमेश जाधव यांच्याबरोबर रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, बी. नागेंद्र, कंप्लीचे आमदार गणेश राजीनाम्याच्या तयारीत होते. परंतु, त्यांनी अचानक लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सर्व सहकाऱ्यांनी निकालापर्यंत कोणतीच घाई करणार नसल्याचे सांगितल्याने रमेश जारकीहोळींची योजना पुन्हा अपयशी ठरली. 

आमदारांच्या मनपरिवर्तनाचा प्रयत्न 
भाजपने युतीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न चालविल्याने भाजपच्या आमदारांना युतीकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन आखण्याचा निर्णय झाला. भाजपमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांना युतीत योग्य स्थान व मान देण्यावर एकमत झाले. तसेच, भाजपशी संपर्क ठेवून असलेल्या आमदारांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and Janata Dal Secular has master plan against BJP