Loksabha 2019 : काँग्रेससह विरोधकांची झोप उडाली : पंतप्रधान

पीटीआय
बुधवार, 24 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर भाजपच्या लाटेचे रूपांतर आव्हानात झाले असल्याने कॉंग्रेस व विरोधी पक्षांची झोप उडाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. 

केंद्रपाडा (ओडिशा) : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांनंतर भाजपच्या लाटेचे रूपांतर आव्हानात झाले असल्याने कॉंग्रेस व विरोधी पक्षांची झोप उडाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. 

भाजपच्या उमेदवारासाठी मोदी यांची आज प्रचारसभा झाली. ""लोकसभेसाठी एकदा आणि विधानसभेसाठी दुसऱ्यांचा दोन्ही हातांनी कमळच्या चिन्हावरील बटण दाबण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. "लहर नही ये ललकार है, फिर एक बार मोदी सरकार है,' अशी घोषणा देत ते म्हणाले, की 2014 मध्येसुद्धा जेवढे प्रेम मला मिळाले नव्हते ते आता मिळत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुकीतील प्रतिसाद पाहता नागरिक अन्य पक्षांपेक्षा भाजपलाच अनुकूल असल्याचेच दिसत आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, असे सांगत जे खोटे आरोप करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. अशा खोटारड्यांना मतदारच आता धडा शिकवतील. कॉंग्रेस आणि अन्‌ विरोधी पक्षांपुढे आता चिंता निर्माण झाली असून, माझ्यावर टीका करण्यासाठी ते नव्या सबबी शोधत आहे, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांना फटकारले. 

"नवीनबाबू, तुमची निघण्याची वेळ झाली' 

"ओडिशातील नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने केवळ सत्ता मिळविण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्राधान्यक्रमात विकास कधीच नव्हता. ओडिशातील जनता "बीजेडी' सरकारचा निरोप घेतील. राज्यातील सत्ताधाऱ्यांपेक्षा जनता खूप शहाणी आहे. नवीनबाबू, आता तुमची निघण्याची वेळ झाली आहे,'' असे मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and Opposition Party are become Sleepless says Narendra Modi