Loksabha 2019 : महाराष्ट्राचे पाणी काँग्रेसने पळविले : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

काँग्रेसकडे आता कसलेच ठोस मुद्दे नाहीत. ते आता गलीतगात्र झाले आहेत.

भोकर : कॉंग्रेसकडे आता कसलेच ठोस मुद्दे नाहीत. ते आता गलीतगात्र झाले आहेत. त्यांना भाड्याने माणसे लावून प्रचार करावा लागत आहे. ज्यांना जनतेनी घरी बसवले ते अभ्यास न करता आरोप करीत आहेत. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यासाठी कॉंग्रेसने करार केला होता. तो मी रद्द केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नांदेड मतदारसंघातील भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. 13) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ""मोदी सरकारने मागील पाच वर्षांत देशात अनेक लोकाभिमुख योजना राबवून जनतेला दिलासा दिला आहे. जलमंत्रालय योजनेंतर्गत नदीजोड प्रकल्प, वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे काम हाती घेतले आहे. कॉंग्रेस पक्ष केवळ भाषण करीत आहे, तर भाजप विकास करीत आहे. 

शेतकरी, सामान्य जनतेच्या हितासाठी झटणारा आमचा पक्ष आहे. कॉंग्रेसतर्फे गरिबी हटावचा नारा पाच पिढ्यांपासून सुरू असला, तरी त्यांनी गरिबी हटविली नाही. त्यांच्या जाहीरनाम्यात लष्कराचे अधिकार काढू, अशी भाषा आहे. ही बाब गंभीर आहे. साठ वर्षांत कॉंग्रेसने दुराचारी, भ्रष्टाचारी सरकार चालवले. आम्ही पाच वर्षांत स्वच्छ पारदर्शी कारभार केला आहे. त्यामुळे जनता मोदीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.'' 

काँग्रेसकडे किरायाची माणसे

नांदेड मतदारसंघात भाजपचा झंझावात सुरू झाल्याने कॉंग्रेसला मंडप, खुर्च्या, माणसे आणि नेतेसुद्धा भाड्याने आणण्याची वेळ आली आहे. आम्ही फक्त मंडप भाड्याने घेतो. माणसे, नेते भाड्याने आणावे लागत नाहीत. राज ठाकरे यांना जनतेने घरी बसवले, मला मात्र याच जनतेने खुर्चीवर बसवले आहे. भाड्याच्या लोकांच्या भरवशावर सत्ता चालवता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

Web Title: Congress Diverted Water to Other says Devendra Fadnavis