Loksabha 2019 : काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्याने भाजपच्या कपिल पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा

bhivandi
bhivandi

वज्रेश्वरी (बातमीदार) - सेना भाजपच्या युतीनंतर तिकीट वाटपाच्या मुद्यावरून भिवंडी लोकसभा मतदार संघ राज्यभर चर्चेचा मतदार संघ ठरला होता. त्यामुळे या मतदार संघाचे तिकीट नेमके कोणाच्या वाट्याला येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी तडजोड करीत भिवंडी लोकसभा मतदार संघ भाजप कडे सोपविला. युतीने भिवंडी मतदार संघ भाजपच्या वाट्याला सोडल्यामुळे शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता व नाराजी पसरली होती. त्यातूनच भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या उमेदवारीला तर सेनेच्या गोटातून जाहीर विरोध होता. विशेष म्हणजे भाजपने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिल्यास आपण उघडपणे बंडखोरी करणार अशी भूमिका शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हात्रे यांनी घेतली होती. त्याला सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दुजोरा देखील दिला होता. आपला भाजपला विरोध नसून खासदार कपिल पाटील यांच्या कुटणीतीला विरोध आहे. त्यामुळे भाजपने येथे दुसरा कोणताही उमेदवार द्यावा असा पवित्रा सुरेश म्हात्रे यांच्यासह शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र शिवसैनिकांच्या विरोधाला न जुमानता भाजपने खासदार कपिल पाटील यांनाच उमेदवारी दिल्याने सेनेमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच भिवंडी लोकसभा मतदार संघात अल्पसंख्यांक मतदार अधिक असल्याने, तसेच भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने 

या मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असे असूनही भाजपच्या उमेदवाराला रोखण्यासाठी काँग्रेस कडून सक्षम उमेदवार मिळण्याची गरज होती, मात्र काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी काँग्रेस उमेदवारीची माळ माजी खासदार सुरेश टावरे यांच्या गळ्यात घातल्याने भाजपच्या कपिल पाटलांचा विजय आता निश्चित मानला जात असून भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणूक एकतर्फी होणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 

2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे भिवंडी लोकसभेतून निवडून आले होते. मात्र खासदार म्हणून निवडून आल्या नंतर टावरे यांनी पक्ष वाढीसाठी फारसे प्रयत्न केलेले दिसले नाही त्यामुळे पक्षश्रेष्ठींची टावरे यांच्यावर नाराजी होती. त्यातच 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटे समोर सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सुरेश टावरे यांना डावलून त्यांना उमेदवारी न देता कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत विश्वनाथ पाटील यांचा पराभव होऊन भाजपचे कपिल पाटील यांचा विजय झाला होता. विशेष म्हणजे निवडून आल्या नंतर खासदार कपिल पाटील यांनी आपल्या मतदार संघाबरोबरच राज्यासह दिल्लीत देखील आपले वर्चस्व सिद्ध केले असल्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसने सक्षम उमेदवार देण्याची गरज असतांना सुरेश टावरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भिवंडी महापालिका निवडणुकीत तसेच भिवंडी पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत देखील सुरेश टावरे यांनी केलेल्या कूट नित्यांमुळे काँग्रेसची शहर कमिटी सुरेश टावरे यांच्यावर नाराज आहे त्यामुळे सुरेश टावरे यांना शहरातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळणार की नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेसमध्ये देखील सुरेश टावरे यांनी आतापर्यंत फारसे लक्ष दिले नसल्याने तालुका काँग्रेस कार्यकर्ते देखील सुरेश टावरे यांच्यावर नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यावेळेस डावळल्याने विश्वनाथ पाटील काय भूमिका घेतली हे पाहणे गरजेचे आहे. जर विश्वनाथ पाटील यांनी सुरेश टावरे यांच्या विरोधात भूमिका घेतली तर सुरेश टावरे यांच्या समोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यातच खासदार कपिल पाटील यांच्याकडे असलेला स्वतःचा हक्काचा मतदार व कार्यकर्ता सुरेश टावरे यांच्याकडे नाही. त्यातच निवडणूक व राजकारणात आवश्यक असणारी साम, दाम, दंड, भेद हि नीती देखील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्याकडे नसल्याने आपसुकच भाजपचे खासदार कपिल पाटील यांचा या निवडणुकीत विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

त्यामुळे भिवंडी लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com