Loksabha 2019 : आमची दारे 'आप'साठी खुली : राहुल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

दिल्लीतील आघाडीवरून कॉंग्रेस-"आप'ची जुंपली 
दिल्लीतील प्रस्तावित आघाडीवरून कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात (आप) पुन्हा जुंपली आहे. कॉंग्रेसने चार जागा देऊनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घूमजाव केल्याची तोफ राहुल गांधींनी आज डागली, तर "घूमजाव कसला? अजूनपर्यंत वाटाघाटी सुरूच होत्या,' अशी आठवण करून देताना "आप'ने दिल्लीत कॉंग्रेसचा एक आमदार किंवा खासदार नसताना तीन जागांची मागणी कशाच्या आधारे, असा प्रश्‍न केला आहे. 

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच दिल्लीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आम आदमी पक्षासाठी (आप) आमची दारे खुली असल्याचे सुचक उद्‌गार काढले आहेत. आमची दारे अजूनही खुली असून वेळ मात्र संपत चालली आहे, असे राहुल यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीमध्ये आम्ही "आप'ला चार जागा द्यायला तयार आहोत; पण केजरीवालांनी मात्र यूटर्न घेतला आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

दिल्लीतील आघाडीवरून कॉंग्रेस-"आप'ची जुंपली 
दिल्लीतील प्रस्तावित आघाडीवरून कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात (आप) पुन्हा जुंपली आहे. कॉंग्रेसने चार जागा देऊनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घूमजाव केल्याची तोफ राहुल गांधींनी आज डागली, तर "घूमजाव कसला? अजूनपर्यंत वाटाघाटी सुरूच होत्या,' अशी आठवण करून देताना "आप'ने दिल्लीत कॉंग्रेसचा एक आमदार किंवा खासदार नसताना तीन जागांची मागणी कशाच्या आधारे, असा प्रश्‍न केला आहे. 

दिल्लीत "आप' आणि कॉंग्रेसच्या आघाडीचे कवित्व अजूनही सुरूच आहे. अलीकडेच दोन्ही पक्षांनी हा मुद्दा आपल्यापुरता संपल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. आज मात्र दोन्ही पक्षांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा ट्विटअस्त्राद्वारे एकमेकांविरुद्ध हल्लाबोल केला. 
राहुल गांधी यांनी ट्विट करून केजरीवाल यांना लक्ष्य केले. "दिल्लीत कॉंग्रेस आणि आपची आघाडी झाल्यास भाजपचा सुपडा साफ होईल. कॉंग्रेस यासाठी आपल्या चार जागा देण्यास तयार आहे; परंतु श्रीयुत केजरीवाल यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत; परंतु वेळ निघून चालली आहे,' असे राहुल गांधी यांनी म्हटले. 

प्रत्युत्तरादाखल केजरीवाल यांनी कॉंग्रेसची आघाडीची इच्छा नसून, केवळ देखावा निर्माण केला जात आहे, अशा शब्दांत फटकारले. "घूमजाव कसला? अजूनपर्यंत वाटाघाटी सुरूच होत्या. आपले (राहुल गांधींचे) ट्‌विट दर्शवते, की आघाडीची इच्छा नाही. केवळ देखावा उभा केला जात आहे. अशी विधाने दुःख देणारे आहेत. आज देशाला मोदी-शहांपासून वाचविणे महत्त्वाचे आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्येही मोदीविरोधी मतांची विभागणी करून मोदींना मदतच करत आहात', असा प्रतिहल्ला केजरीवाल यांनी चढवला. या वाटाघाटींमध्ये सहभागी असलेले "आप'चे खासदार संजय सिंह यांनी दिल्लीत कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याची आठवण करून दिली.

Web Title: Congress ready to leave four seats for AAP in Delhi Says Rahul Gandhi