Loksabha 2019 : काँग्रेसला काँग्रेसकडूनच धोका

Loksabha 2019 : काँग्रेसला काँग्रेसकडूनच धोका

मुंबई : काँग्रेसच कॉंग्रेसला हरवू शकते, असे कधी काळी मानले जायचे. आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर याची प्रचिती येत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार निवडताना निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे, तर दुसरीकडे "माझे कोणी ऐकत नसल्यामुळे मीच राजीनामा देण्याचा विचार करत आहे,' अशी अगतिकता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

राज्यातील अनेक मतदारसंघांत गटबाजीचा उद्रेक होऊन बंडाचा झेंडा फडकविण्याची तयारी कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. नगरची लोकसभेची जागा कॉंग्रेससाठी सोडवून घेण्यात अपयश आल्यानंतर उमेदवारीबाबतचे नवे वाद समोर येत आहेत. चंद्रपूरमध्ये कॉंग्रेसने विनायक बंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. येथील उमेदवारीसाठी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना उमेदवारीच न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना चंद्रपूरच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. "पक्षात माझे काहीही चालत नाही. मीच राजीनामा देण्याचा विचार करतोय' अशी अगतिकता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना व्यक्‍त करावी लागली. मुकुल वासनिक यांचे नाव पुढे करत पक्षांतर्गत गटबाजीचा गौप्यस्फोटही अशोक चव्हाण यांनी केल्याचे मानले जात आहे. 

कार्यकर्त्यांचे सहकार्य नाही 

औरंगाबाद लोकसभेतही पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सलग 36 वर्षे कॉंग्रेसमध्ये सक्रिय राजकारण करणारे व मुस्लिम चेहरा असलेले अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सनातन साधकाच्या समर्थकाला उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. तर पुणे व हिंगोली या लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांबाबतचा पेच अजूनही सुटलेला नाही. राहुल गांधी यांचे अत्यंत विश्‍वासू व निकटवर्तीय असलेल्या खासदार राजीव सातव यांना स्थानिक पदाधिकारी सहकार्य करणार नाहीत म्हणून निवडणूकच लढवण्याची इच्छा नाही.

तर पुणे लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची खात्री असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रोषासमोर पक्षाचे नेतृत्व अगतिक झाल्याचे चित्र आहे. मुंबईतही तीन जागा जाहीर केल्यानंतर इतर दोन जागांवरील उमेदवार निश्‍चिती संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. 

देशात व राज्यात कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी असतानाही कॉंग्रेसला गटबाजीचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नसल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षांतर व बंडाळीचा सुखकर मार्ग स्वीकारण्याची तयारी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com