Loksabha 2019 : काँग्रेस लष्कराला कमकुवत करतेय : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 एप्रिल 2019

ओडिशातील निवडणुकीचे निकाल हे देशाला धक्का देणारे असतील. भाजपच्या पदरात मोठा विजय पडेल. जनता बिजू जनता दल आणि कॉंग्रेसलाही नाकारेल. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुंदरगड (ओडिशा) : "देशाच्या चौकीदाराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठाण्यांवर हल्ले करण्याचे धाडस दाखविले पण कॉंग्रेस मात्र आमच्या सशस्त्र दलांना कमकुवत करत आहे,'' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. मोदींनी आज ओडिशातील सुंदरगड आणि भुवनेश्‍वर येथे सभा घेत विरोधकांवर निशाणा साधला. 

याआधीही अनेक सरकारे आली, पण त्यांनी कधीच सर्जिकल स्ट्राईक केला नाही, विमानांच्या माध्यमातून देशाची सीमा ओलांडून दहशतवाद्यांना ठार मारण्याचे धाडस त्यांच्याकडे नव्हते. दहशतवादी आणि माओवाद्यांना आश्रय देणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे. आता लोकांनाच निर्णय घ्यावा लागेल की त्यांना तत्त्वाने वागणारे विकासासाठी कटीबद्ध सरकार हवे की भ्रष्ट आणि अनैतिक शासन हवे. या खेपेस ओडिशामध्ये कमळ नक्कीच फुलेल. भाजप विजयाची चव चाखेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
या वेळी त्यांनी ओडिशातील बिजू जनता दलाच्या सरकारवरदेखील टीका केली, ओडिशाच्या दृष्टीने यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे ते म्हणाले,

भाजपच्या स्थापना दिनाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, "आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या घामातून उभा राहिला असून घराणेशाही अथवा पैशातून नव्हे. दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, जगन्नाथराव जोशी, राजमाता शिंदे आणि मुरली मनोहर जोशी अशा दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सॅल्यूट करतो. भाजप ही जगातील सर्वांत मोठी लोकशाहीवादी संघटना आहे.'' 

Web Title: Congress weakens the army says Narendra Modi