Loksabha 2019 : ममतांकडून राज्यघटनेचा अवमान : पंतप्रधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

मला देशाचा पंतप्रधान म्हणून अमान्य करून ममता बॅनर्जी राज्यघटनेचा अवमान करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांनी आजच्या येथील प्रचारसभेत ममतांवरील टीकेची धार कायम ठेवली. 

बांकुरा (पश्‍चिम बंगाल) : मला देशाचा पंतप्रधान म्हणून अमान्य करून ममता बॅनर्जी राज्यघटनेचा अवमान करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांनी आजच्या येथील प्रचारसभेत ममतांवरील टीकेची धार कायम ठेवली. 

"या देशाच्या पंतप्रधानाला देशाचा प्रमुख मानण्यास ममतादीदी जाहीररीत्या नकार देत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला मात्र मान्यता देत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीपोटी त्या आता राज्यघटनेचाही अवमान करत आहेत,' अशी टीका मोदींनी केली. ममता यांनी तीन दिवसांपूर्वीच्या एका सभेत मोदींचा उल्लेख "एक्‍सपायरी पीएम' असा केला होता. त्याचा संदर्भ देत मोदींनी ही टीका केली.

"ममतांना राज्याच्या कल्याणात काहीही रस नसून त्यांच्या भाच्याला आणि पक्षातील खंडणीबहाद्दरांना राजकारणात स्थिर करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी राज्याचे नुकसान केले आहे. मोदींना थप्पड मारावीशी वाटते, असेही ममता म्हणाल्या होत्या. त्यांच्या भाषेवरूनच त्यांची अगतिकता दिसून येते,' असा आरोपही मोदींनी केला. 

मोदी उवाच... 

- ममतांनी माझ्यावर राग काढण्याऐवजी चिटफंड गैरव्यवहारातील दोषींवर काढावा, बेरोजगारांची काळजी घ्यावी, देवीभक्तांना भयमुक्त वातावरण निर्माण करून द्यावे 
- ममतांना बेकायदा निर्वासितांची काळजी; पण स्थानिक आदिवासींची नाही 
- केंद्रातर्फे 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्के घर आणि प्रत्येक घरी गॅसजोडणी 

"लोकशाहीची थप्पड' असे म्हणाले होते.... 

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला थप्पड लगाविण्याची भाषा करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी आज बांकुरा येथील सभेत करताच ममतांनी यावर तातडीने स्पष्टीकरण दिले.

"मी लोकशाहीची थप्पड असा शब्द वापरला होता. म्हणजे, जनता मतदानाद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करतील, असा त्याचा अर्थ होता. आधी भाषा जरा समजून घ्या. मी कशाला तुम्हाला थप्पड मारू, मी त्या प्रकारची व्यक्ती नाही,' असे ममता म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contempt of the Constitution from Mamata says Narendra Modi