Loksabha 2019 : विरोधी पक्षांच्या हाती देश सुरक्षित नाही : शहा 

पीटीआय
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

"विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती देश सुरक्षित राहणार नाही,'' अशी टीका करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाला लक्ष्य केले.

गाझीपूर (उत्तर प्रदेश) (पीटीआय) : "विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या हाती देश सुरक्षित राहणार नाही,'' अशी टीका करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षाला लक्ष्य केले.

गाझीपूर मतदारसंघातील सभेत बोलताना शहा म्हणाले, की पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे "बसप'च्या प्रमुख मायावती आणि "सप' व कॉंग्रेस या त्यांच्या मित्रपक्षांचे अध्यक्ष अनुक्रमे अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे निराश झाले आहेत. हे "महामिलावटी' लोक देशाबद्दल बोलतात. पण, अखिलेश, मायावती आणि कॉंग्रेस देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. भाजप देशाच्या सुरक्षेशी कधीही खेळू शकत नाही. जर त्यांच्याकडून (पाकिस्तान) बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या, तर इथून (भारत) बॉंब पाठविला जाईल. "ईट का जबाब पत्थर से दिया जायेगा,' असे सांगत त्यांनी भाजपची भूमिका मांडली.

दहशतवाद्यांशी भाजप "इलू-इलू' (आय लव्ह यू) करू शकत नाही, असे म्हणत बालाकोटमधील हवाई हल्ल्यात जे दहशतवादी ठार झाले ते पाकिस्तानचे होते, तरी "बुआ (मायावती), भतीजा (अखिलेश) आणि राहुल बाबा यांच्या कार्यालयात शोककळा पसरलेली होती. ते एवढे दुःखी का होते, याचे कारण मला समजू शकले नाही. ते लांब चेहरा करून का फिरत आहेत? मारले गेलेले दहशतवादी त्यांच्या मातृ-पितृ घराण्यातील भाऊबंद होते का?, असा सवाल शहा यांनी केला. 

"तुकडे- तुकडे गॅंग'सह गांधी आणि कॉंग्रेस देशाला तोडू पाहत आहे. राष्ट्रद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासन म्हणजे देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचा तुरुंगात जाण्यापासून रोखण्याची चाल आहे. 
- अमित शहा, भाजपचे अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country is not safe in the hands of opposition parties says Amit Shah