Loksabha 2019 : देशाचे विभाजन होऊ देणार नाही : पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

"काँग्रेसला रोगाची बाधा' 

"जालियनवाला'चे राजकारण

कथुआ (जम्मू- काश्‍मीर) : अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन कुटुंबांनी जम्मू- काश्‍मीरच्या तीन पिढ्यांचे नुकसान केले, आता त्यांना देशाचे विभाजन करू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. जम्मू- काश्‍मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची मागणी करणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सवर त्यांनी आज जोरदार टीका केली. 

पंतप्रधान मोदींनी आज उधमपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या प्रचारासाठी कथुआ येथे सभा घेतली. या वेळी त्यांनी अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबांवर शाब्दिक हल्ला चढविला. ""अब्दुल्ला आणि मुफ्ती कुटुंबांनी राज्यातील तीन पिढ्यांचे भविष्य नष्ट केले. त्यांच्यामुळेच तीन पिढ्या राज्याचा विकास झाला नाही. त्यामुळे राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मतदारांनी या दोन्ही कुटुंबांना नाकारावे. ते आपल्या सगळ्या घराण्याला राजकारणात आणू शकतात, माझ्यावर कितीही चिखलफेक करू शकतात; पण या देशाचे विभाजन ते करू शकणार नाहीत,'' असे मोदी सभेत म्हणाले. 

पहिल्या टप्प्यात काश्‍मीरमधील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून दहशतवाद्यांना, संधिसाधूंना लोकशाहीची ताकद दाखवून दिली असून, "महामिलावट' आघाडीलाही धक्का दिला असल्याचा दावा मोदींनी केला. 

"काँग्रेसला रोगाची बाधा' 

पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवरही शरसंधान केले. "या पक्षाला रोगाची बाधा झाली असून, सत्ता आल्यास लष्कराचा विशेषाधिकार कायदा रद्द करण्याचे ते आश्‍वासन देत आहेत. याद्वारे जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा त्यांचा डाव असून कोणताही देशभक्त असे आश्‍वासन देऊ शकणार नाही,' असे मोदी म्हणाले. 

"जालियनवाला'चे राजकारण 

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचेही राजकारण केल्यावरून पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी खुद्द उपराष्ट्रपतीही हजर असताना मुख्यमंत्री अमरिंदरसिंग अनुपस्थित असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

असे करून मुख्यमंत्र्यांनी जालियनवाला बाग स्मारकाचा अवमान केला असल्याचे मोदी म्हणाले. अमरिंदरसिंग यांच्या देशभक्तीबाबत शंका घेण्याचे काही कारण नसले तरी "परिवारभक्ती' करण्यासाठी बळजबरी होत असल्याने ते दबावात आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: The country will not be divided says Narendra Modi