Loksabha 2019 : सत्ताधाऱ्यांच्या चुकीतून कन्हैय्याचा उदय

ज्ञानेश्‍वर बिजले
रविवार, 28 एप्रिल 2019

देशपातळीवर डाव्या विचारसरणीच्या एका नव्या नेत्याचा उदय होतो आहे, तेही उजव्या विचारसरणीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या एका चुकीच्या निर्णयातून... 

'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.' 

विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर हल्ला. देशपातळीवर गेल्या तीन वर्षांत विद्यार्थी नेता म्हणून नावारुपाला आलेला 'डॉ. कन्हैय्या कुमार' निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातील लढतीने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
सामान्यांचे प्रश्‍न मांडत केंद्र सरकारच्या कारभारावर थेट हल्ला, सोशल मिडीयाचा वापर, देशभरातून प्रचारासाठी आलेले विद्यार्थी यांमुळे येथील प्रचाराची रंगत वाढली. 'नेता नही बेटा है' ही त्याची प्रचार घोषणा घरोघर पोहोचली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) आलेल्या विद्यार्थी सहकाऱ्यांनी मतदारसंघातील गावोगाव प्रचाराच्या नियोजनाची जबाबदारी स्विकारली. पथनाट्ये, कोपरासभा, घरोघरी प्रचार, तसेच व्हिडिओ, व्हॉटसअप, ट्विटर या सोशल मिडियाचा वापर यामुळे प्रचाराची उंची त्यांनी गाठली आहे. निवडणूक प्रचाराचे सत्तर लाख रुपयेही त्यांनी सभेत लोकांकडून गोळा केले. 

देशातील सत्ताधारी पक्ष हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा मुद्दा महत्त्वाचा म्हणून मांडत असताना, निवडणुकीवर जातीयवादाचा पगडा असलेल्या बिहारमध्ये पुन्हा एकदा डाव्या विचाराची मांडणी करणाऱ्या या युवा नेत्याने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे बेगुसरायच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य. त्याच्याविरुद्ध मैदानात आहेत, भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह आणि राजदचे डॉ. तन्वीर हसन. भूमीहार आणि त्या खालोखाल मुस्लीम समाज येथे मोठ्या संख्येने आहे. भूमीहार जातीतून गिरीराजसिंह आणि कन्हैय्या कुमार आहेत, तर गेल्या निवडणुकीत साठ हजार मतांनी पराभूत झालेले डॉ. तन्वीर हसन यांना राजदमुळे यादव समाजाचाही पाठिंबा आहे. 

मात्र, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेही (सीपीआय) येथे काम असून, गेल्या दोन्ही निवडणुकीत सीपीआय उमेदवाराने दीड ते दोन लाख मते येथून मिळविली. बेगुसरायला देशातील 'लेनिनग्राड' असे संबोधले जाते. सीपीआयचे पहिले आमदार चंद्रशेखर सिंह येथील टेघरा मतदारसंघातून 1962 मध्ये निवडून आले. देशात सीपीआय स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते कन्हैय्या कुमार याचे नातेवाईक आहेत. हे सांगण्याचा मुद्दा म्हणजे बेगुसरायमध्ये डाव्या विचाराचीही बैठक आहे. एकदा येथून सीपीआयचा खासदारही होता. गेल्या निवडणुकीत भाजपचे खासदार झालेले भोलासिंह पूर्वाश्रमी सीपीआयचे आमदारही होते. गेल्या काही काळात सीपीआयची मते कमी झाली असली, तरी त्यांना मानणारा मतदारही येथे मोठ्या संख्येने आहे. 

आधुनिक प्रचारामुळे कन्हैय्या कुमारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'मोबाईल टॉर्च' मार्च ही त्याची कालची वेगळी संकल्पना. चार-पाच हजार युवक युवतींनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात प्रचाराच्या सांगतेनिमित्त काढलेली फेरी ही देशभरातील प्रचारामध्ये आगळीवेगळी ठरली. 'दसवी पास मंत्री हुआ हैं, और इंजिनीअर हुआ विद्यार्थी पकोडा तल रहे है,' या त्याच्या मुद्द्याने विद्यार्थ्याच्या काळजाला हात घातला. त्याच सभेत कन्हैय्या कुमारने शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. गेल्या निवडणुकीत मोदी यांनी शेतमालाला दुप्पट भाव आणि दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर प्रचारात जोर दिला. देशात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत, तसेच बेरोजगारीही वाढली आहे. 'तमिळनाडूतील 111 शेतकरी, तर बीसीएफचा जवान वाराणसीतून मोदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत,' याकडे लक्ष वेधत कन्हैय्या कुमारने मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले. 'पंडीत नेहरूंच्या काळात काय झाले, काँग्रेसने काय केले नाही, ते सांगू नका, गेल्या पाच वर्षांत मोदी तुम्ही काय केले ते सांगा,' असा रोखठोक सवाल तो करतो. लोकांना त्याची भाषणे अपील होतात. जात-धर्माचा वापर तो प्रचारात करीत नाही, तर सामान्यांचे प्रश्‍न मांडण्यावरच भर देत आहे. राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावरही तो सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्‍न करीत आहे. लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी ही निवडणूक असल्याचे तो सांगतो. 

कन्हैय्या कुमार या 'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेच्या नेत्यावर भाजप सरकारने देशद्रोहाचा आरोप ठेवला आणि फेब्रुवारी-मार्च 2016 मध्ये तो अचानक प्रकाशझोतात आला. 'जेएनयू' प्रवेश परीक्षेत प्रथम येत तो 2011 मध्ये विद्यापीठात दाखल झाला. या वर्षी तो डॉक्‍टर होऊन बाहेर पडला. त्याच्यावरील आरोपामुळे विद्यार्थ्यांबरोबरच देशाचे त्याच्याकडे लक्ष गेले. जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या वक्‍तृत्व कौशल्यामुळे देशभरात त्याच्या सभांना मागणी आली. सत्ताधारी पक्षावर हल्ला करणारा, डाव्या विचारसरणीचा या नेत्याने देशभर विद्यार्थ्यांच्या सभा घेतल्या. गेले सहा महिने तो बेगुसरायमध्ये पक्षाची बांधणी करीत आहे. त्याच्या प्रचारासाठी जावेद अख्तर, शबाना आझमी, प्रकाशराज, स्वरा भास्कर यांच्यासह पर्यावरणवादी, अभ्यासक, वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी कार्यकर्ते येथे पोहोचले. योगेंद्र यादव, सीपीआय(एम)चे सिताराम येचुरी, जिग्नेश मेवाणी, डी पी त्रिपाठी यांनी प्रचार केला. सीपीआयचे सेक्रेटरी सुधाकर रेड्डी यांनी राजदला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वी केले. मात्र, लालुप्रसाद यांचा मुलगा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आणखी एका युवा नेत्याचा बिहारमध्ये उदय नको, या उद्देशाने विरोध सुरू ठेवला आहे. 

बिहार व गुजरात या राज्यांना विद्यार्थी आंदोलनाची पार्श्‍वभूमी आहे. सत्तरच्या दशकात या राज्यात झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने देश हादरवून टाकणारी ठरली. तत्कालीन सत्ता त्यांनी उलथवली. त्या काळातील विद्यार्थी नेते लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी यांच्यासह अनेकजण पुढे बिहारच्या राजकारणात आले. गुजरातमधील आंदोलनातून नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. विद्यार्थी चळवळीतील अरुण जेटली, सिताराम येचुरी, प्रकाश कारत यांच्यासह काँग्रेसमधील अनेकजण राजकारणात देशपातळीवर चमकले. 

राज ठाकरे, प्रियांका गांधी आणि कन्हैय्या कुमार या तीन नेत्यांची भाषणे या निवडणुकांत गाजत असल्याचे 'ई-सकाळ'च्या माध्यमातून गेल्या पंधरवड्यात सांगितले होते. तिघांची विचारसरणी, मुद्दे मांडण्याची पद्धत भिन्न आहे. मात्र, तिघेही जमिनीशी जोडणारे मुद्दे मांडत आहेत. तिघेही थेट पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धती, त्यांचे निर्णय, त्यांनी पाळली नसलेली आश्‍वासने यांच्यावरच आक्रमकपणे प्रहार करीत आहेत. 

कन्हैय्या कुमार निवडून येणार की नाही, ते बेगुसरायमधील राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहील. मतदारच आता निर्णय घेतील. मात्र, देशपातळीवर डाव्या विचारसरणीच्या एका नव्या नेत्याचा उदय होतो आहे, तेही उजव्या विचारसरणीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या एका चुकीच्या निर्णयातून... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale Writes About Kanhaiya Kumar CPI and left politics