Loksabha 2019 : तमिळनाडूत काँग्रेससह द्रमुक आघाडीवर

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

द्रमुकचे नेते करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूत ही पहिलीच निवडणूक होत आहे. द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांचे नेतृत्त्व वेगाने पुढे येत आहे. 

तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता यांनी गेल्या निवडणुकीत 39 पैकी 37 जागा मिळवित मोठे यश संपादित केले होते. एनडीएला उर्वरीत दोन जागा मिळाल्या. काँग्रेस, द्रमुकला खातेही उघडता आले नव्हते. मात्र द्रमुकला 24 टक्के मतदान मिळाले होते. यावेळी मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक भाजपच्या एनडीएमध्ये सहभागी झाला आहे, तर त्यांच्याविरोधात काँग्रेस, द्रमुक, डाव्यांसह स्थानिक पक्ष आहेत. यावेळी युपीए मोठ्या संख्येने जागा जिंकतील, असा अंदाज आहे. 

तमिळनाडूत मुख्यत्वे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रादेशिक पक्षांतच मुख्य लढत होते. राष्ट्रीय पक्षांना या राज्यात फारसे स्थान नाही. द्रमुकचे नेते करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. या दोन नेत्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे दोन्ही प्रादेशिक पक्षांनी स्वतःकडे कमी जागा म्हणजे प्रत्येकी वीस जागा ठेवत राष्ट्रीय व स्थानिक पक्षांना आघाडीत सामावून घेतले आहे. 

जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षात मोठ्या उलथापालथी झाल्या. पक्षाच्या नेत्या शशिकला यांना तुरुंगवासात जावे लागले. मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे गट भाजपच्या पुढाकाराने एकत्र आले. पण, त्यांचा जनमानसावर अद्याप प्रभाव पडलेला नाही. शशिकला यांचे भाचे टी. टी. दिनकरन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांचे पाठीराखे असलेल्या 18 आमदारांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. मात्र, जयललिता यांच्या जागी पोटनिवडणुकीत दिनकरन निवडून आले.
 
भाजप व पीएमके गेल्या निवडणुकीत एकत्र लढले होते. त्यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. अण्णा द्रमुकशी युती करताना भाजपने पाच जागा, तर पीएमकेने सात जागा घेतल्या आहेत. चित्रपट अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके यांना चार जागा देण्यात आल्या. केंद्र व राज्यातील सत्तारुढ पक्षांची ही आघाडी असली, तरी त्यांना मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. 

त्या तुलनेत द्रमुकचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काँग्रेससोबत केलेली आघाडी अधिक भक्कम आहे. त्यांनी काँग्रेसला नऊ जागा, डाव्या आघाडीतील सीपीएम, सीपीआयला प्रत्येकी दोन जागा, तर अन्य स्थानिक पक्षांना सहा जागा दिल्या आहेत. स्टॅलिन हेच आता दमदार नेतृत्त्व म्हणून तामिळनाडूत पुढे आले आहे. सहा वेळा आमदार असलेले स्टॅलिन चेन्नईचे पाच वर्ष महापौर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री होते.

तमिळनाडू प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला पराभवाचा सामना करावा लागतो, आणि विरोधकांना मतदारांना पाठिंबा मिळतो. काही अपवाद वगळता तमिळनाडूत हे चित्र पहावयास मिळते. जयललिता यांच्या निधनानंतर गोंधळलेला त्यांचा पक्ष, भाजपचा वाढलेला हस्तक्षेप आणि राज्यावर त्यांची नसलेली पकड याचा फायदा या निवडणुकीत द्रमुकच्या आघाडीला मिळण्याची चिन्हे आहेत. 
त्यातच विधानसभेच्या 22 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सध्या 235 सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे 114 आमदार असून, विरोधकांचे 98 आमदार आहेत. 

केरळ, तमिळनाडू आणि लगतच्या पाँडेचरीतील एक जागा मिळून एकूण साठ जागा आहेत. गेल्या वेळी युपीएकडे 12, तर एनडीएकडे दोन जागा होत्या. या निवडणुकीत युपीए जवळपास 40 ते 45 जागा जिंकण्याची शक्‍यता आहे. डावी आघाडी पाच-सहा जागा जिंकण्याची शक्‍यता असून, एनडीएला दहा - बारा जागा मिळतील, असा अंदाज आहे. 
 

Web Title: Dnyaneshwar Bijale Writes about Tamil Nadu Loksabha Election