Loksabha 2019 : भाजपपुढे जागा राखण्याचे आव्हान 

bjp
bjp

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही रविवार भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तेथील जागा राखण्यात यश मिळविले, तर केंद्रातील सत्ता त्यांच्या आवाक्‍यात येईल. या दोन टप्प्यातील 118 जागांपैकी भाजपच्या 77, तर त्यांच्या एनडीएतील मित्र पक्षांच्या आठ जागा आहेत. या जागा, तसेच विरोधकांच्या उर्वरीत 33 जागांपैकी काही जागा मिळविण्यावर त्यांचा भर राहील. विरोधक मात्र एनडीएच्या जागा कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. 

निवडणुकीच्या तारखा, तसेच मतदानाच्या टप्प्यांतील जादा अंतर भाजपच्या सोयीसाठी त्यांच्या सांगण्यावरूनच केले असावे, असा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच केला. देशातील सुमारे 80 टक्के मतदान आता झाले आहे. हरियाना, दिल्लीतील सर्व जागांसह 59 जागांवर रविवारी (ता. 11), तर हिमाचल प्रदेश, पंजाबसह 59 जागांवर पुढील रविवारी (ता. 18) मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार या तीन राज्यांत सातही टप्प्यांत मतदान होत असून, मध्य प्रदेश व झारखंडमध्ये चार टप्प्यांत मतदान असून, त्याच्या उर्वरीत जागांसाठी शेवटच्या दोन टप्प्यांत मतदान होत आहे. 

उत्तर प्रदेशात भाजपची कसोटी 
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील मतदान शिल्लक राहिले असून, हा परिसर भाजपचा गड मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर जिल्हाही याच परिसरात आहे. उत्तर प्रदेशातील 27 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी समाजवादी पक्षाची एक जागा वगळल्यास, भाजपच्या 24 व त्यांचा मित्रपक्ष अपना दलच्या दोन जागा आहेत. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या आझमगड मतदारसंघात यावेळी त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव निवडणूक लढवित आहेत. भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादव निरहुआ त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, समाजवादी पक्ष तेथे विजयी होईल. 

उर्वरीत सर्व 26 जागा जिंकण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. या भागात बहुजन समाज पक्षाची (बसप) चांगली ताकद आहे. सप-बसप महागठबंधन झाल्याने अनेक मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत आहेत. कॉंग्रेसनेही प्रियांका गांधी यांच्यावर याच भागाची जबाबदारी सोपविली. अन्य पक्षांतून शेवटच्या क्षणी आलेल्या काहीजणांना त्यांनी उमेदवारी दिली. कॉंग्रेसचे उमेदवार विजयी होण्याची शक्‍यता नसली, तरी ते भाजप व महागठबंधन यापैकी कोणाची मते जास्त खाणार, याचा त्या-त्या मतदारसंघातील निकालावर परीणाम होणार आहे. 

बिहारमध्ये अटीतटीच्या लढती 
बिहारमध्ये सोळा जागांवर मतदान होणार असून, दोन्ही रविवारी प्रत्येकी आठ जागा आहेत. गेल्यावेळी बिहारमध्ये एनडीएने 31, राजदने चार, जनता दल (युनायटेड) व कॉंग्रेसने प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक जागा निवडून आली. मतदान होणाऱ्या सोळा जागांमध्ये, भाजपच्या 12, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जद (यू) आणि रामविलास पासवान यांच्या लोजपची प्रत्येकी एक, तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीच्या दोन जागा आहेत. सर्व जागा गेल्या वेळी एनडीएने जिंकलेल्या आहेत. आता कुशवाह यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद-कॉंग्रेस आघाडीत प्रवेश केला आहे, तर जद(यू)चे नितीशकुमार भाजपसोबत आहेत. 

बिहारमध्ये आघाड्यांमध्ये झालेल्या फेरबदलांमुळे गेल्या निवडणुकीतील आकडेवारी फारशी उपयोगी पडणार नाही. भाजप व जद(यू) चे कार्यकर्ते एकमेकांसाठी प्रचारात फारसे सक्रिय नसले, तरी विरोधी आघाडीतील तीन-चार पक्षांतही तशीच परिस्थिती आहे. भाजपने मोठे नेते अन्य राज्यांतील प्रचारात मग्न असल्याने, बिहारमध्ये स्थानिक नेत्यांवरच उर्वरीत जागा जिंकण्याची जबाबदारी आहे. विरोधकांच्या मतदारसंघांत पहिल्या पाच टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे, आणखी काही जागा मिळविण्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

झारखंडमध्ये बिहारमधील राजकीय वातावरणाचे पडसाद उमटतात. तेथील 14 पैकी 12 जागा भाजपने, तर दोन जागा झारखंड मुक्‍ती मोर्चा या कॉंग्रेसप्रणित युपीए आघाडीने जिंकल्या. पहिल्या दोन टप्प्यात भाजपच्या सात जागांवर मतदान झाले, तर रविवारी (ता. 11) भाजपच्या चार जागांवर मतदान होत आहे. पुढील रविवारी भाजपची एक आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या दोन जागांवर मतदान होईल. 

दिल्ली, हरियानात भाजप आघाडीवर 
दिल्ली व हरियानामध्ये 11 मे रोजी मतदान होत असून, तेथे भाजपला जागा राखण्यात चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील सर्व सातही जागा भाजपच्या ताब्यात असून, त्यापैकी एखाददुसरी जागा आप जिंकेल. हा अपवाद वगळल्यास दिल्लीतील तिरंगी लढतीत भाजप बाजी मारेल. हरियानातही भाजपचे राज्य सरकार असून, तेथेही जागा राखण्यात त्यांना फारशी अडचण येणार नाही. हरियानातील दहापैकी भाजपकडे सात जागा, भारतीय लोकदलाकडे दोन, तर कॉंग्रेसकडे एक जागा आहे. लोकदलात आता फूट पडली आहे. तसेच, विधानसभा निवडणूक येत्या ऑक्‍टोबरमध्ये होणार असल्यामुळे, सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागले आहेत. 

पंजाबात काँग्रेसचा जोर 
पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेशात 19 मे रोजी मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशातील चारही जागा, तसेच चंदीगडची एकमेव जागा भाजपने जिंकली होती. तेथे पुन्हा जिंकण्यात भाजपला फारशा अडचणी येणार नसल्या, तरी पंजाबात मात्र कॉंग्रेसने तगडे आव्हान उभे केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएतील अकाली दलाचे चार जागा, भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसने तीन, तर आपने चार जागा जिंकल्या. 

पंजाबात नंतर अकाली दलाच्या सरकारला पराभूत करून, कॉंग्रेसने सत्ता मिळविली. गुरुदासपुर मतदारसंघात भाजपचे खासदार अभिनेते विनोदखन्ना यांच्या निधनानंतर कॉंग्रेसने पोटनिवडणूक जिंकली. तेथे भाजपने अभिनेते सनी देओलला उमेदवारी दिली. आपचा प्रभावही आता कमी झाला असल्याने, त्यांच्याशी आघाडी करण्यास कॉंग्रेसने नकार दिला. पंजाबात एनडीएतर्फे अकाली दल दहा, तर भाजप तीन जागांवर लढत आहे. येथे कॉंग्रेसने मुसंडी मारली, तरी अकाली दल व आपच्या जागा घटतील. भाजपकडे आता एकच जागा शिल्लक असल्याने, त्यांचे नुकसान होणार नाही. 

पश्‍चिम बंगालात ममता प्रबळ 
पश्‍चिम बंगालमध्ये 42 पैकी उर्वरीत 17 जागांवर शेवटच्या दोन टप्प्यांत मतदान होत आहे. त्या सर्व जागा राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचारात थेट हल्ला करीत आहेत. त्यांची राज्यातील ताकदही चांगली आहे. भाजपने राज्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेस व डाव्या आघाडीची मते त्यांच्याकडे वळतील. मात्र, ती निवडणूक जिंकण्याएवढी असली पाहिजेत. तृणमूलच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, ते भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकल्या होत्या, त्या आता वाढतील. उर्वरीत दोन टप्प्यात भाजपला गमावण्यासारखे काही नाही. मात्र, या टप्प्यात भाजप नेत्यांना उत्तर प्रदेश व बिहारात लक्ष केंद्रीत करावे लागत असल्याने, ते बॅनर्जी यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यांना राज्यातच प्रचार करावा लागत असल्याने, शेवटच्या टप्प्यातील नऊही जागांवर त्या प्रचारासाठी जाऊ शकणार आहेत. 

भाजपला गेल्या निवडणुकीसारखे एकहाती बहुमत मिळणार नाही, हे भाजपचे नेते राम माधव यांनी मान्यच केले आहे. किंबहुना, एनडीएचे सरकार असेल, असेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले. त्यामुळे भाजपला या शेवटच्या दोन टप्प्यात जागा राखण्याचे आव्हान आहे. त्या राखल्यास, एनडीए बहुमताचा 272 चा टप्पा गाठू शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com