Loksabha 2019 : भाजपला मतदान करू नका; 600 कलाकारांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

भाजप व त्याच्या मित्रपक्षांना मतपेटीद्वारे हाकलून लावा; भाजपला मतदान करू नका, असे आवाहन तब्बल 600 नामवंत कलाकार व लेखकांनी पत्रकाद्वारे केले आहे. हे पत्रक 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

मुंबई -  भाजप व त्याच्या मित्रपक्षांना मतपेटीद्वारे हाकलून लावा; भाजपला मतदान करू नका, असे आवाहन तब्बल 600 नामवंत कलाकार व लेखकांनी पत्रकाद्वारे केले आहे. हे पत्रक 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

"आर्टिस्ट्‌स युनायटेड इंडिया' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या पत्रकात "भारतीय संविधान धोक्‍यात आहे; भाजपला मतदान करू नका', असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकावर गिरीश कर्नाड, अमोल पालेकर, नसिरुद्दीन शहा, शांता गोखले, महेश एलकुंचवार, कोंकणा सेनशर्मा, मकरंद देशपांडे, स्मिता वसिष्ठ, अनुराग कश्‍यप आदी लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

यापूर्वी 100 पेक्षा जास्त कलावंतांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यात आशिक अबू, आनंद पटवर्धन, सुवेदन, दीपा धनराज, गुपविंदर सिंह, पुष्पेंद्र सिंह आणि प्रवीण मोरछले आदींचा समावेश होता. 

भारताची संकल्पना धोक्‍यात 
भारताची संकल्पना धोक्‍यात आली आहे. आमचे नाच, गाणी, विनोद धोक्‍यात आले आहेत. त्यातून आपले संविधानही सुटलेले नाही. प्रश्‍न विचारणे, खोटारडेपणा उघड करणे यांवर पडदा टाकला जात असून, खरे बोलणाऱ्या माणसाला राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. सर्वत्र विद्वेष दिसून येत आहे. म्हणूनच या सत्ताधाऱ्यांना घालवा; भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

Web Title: Do not vote for BJP 600 writers artists appeal to voters