Loksabha 2019 : मुद्द्यांवरून गुद्द्यांवर अन्‌ विकासावरून जातीवर

दत्ता देशमुख
सोमवार, 8 एप्रिल 2019

भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी नेत्यांची फौज आहे, तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांचीही साथ लाभणार नाही. तरीही, त्यांनी आपल्यापरीने आव्हान उभे केले आहे. प्रचारही मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आणि विकासावरून जातीवर सरकला आहे.

भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात बीडमध्ये सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांच्यासह अन्य पक्ष व अपक्ष मिळून ३६ उमेदवारांची भाऊगर्दी आहे. जाधव यांच्यासह इतर उमेदवार किती मते घेतात, यावर दोन्हीही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. सुरुवातीला बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोर पकडलेला असताना भाजपच्या तगड्या नेत्यांच्या फौजेत आता राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागरदेखील सामील झाले आहेत. प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यातच निवडणूक मुद्द्यावरून गुद्द्यावर, विकासावरून जातीवर सरकल्याचे चित्र आहे. भाजपनेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप गाजत आहेत.

राज्याची सत्ता भगिनी पंकजांकडे, दोन खात्यांच्या मंत्रिपदासह पालकमंत्रिपद, विधानसभेचे पाच, परिषदेचा एक असे सहा आमदार, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून लोहमार्गाचे काम, राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यातील रस्ते, कार्यालयांच्या इमारतींना निधी, असे मुद्दे भाजपकडून पुढे केले जात आहेत. शेतकरी कर्जमाफी, मराठा आणि धनगर समाज आरक्षण, दर्जाहीन कामे आणि रेल्वेमार्गाच्या कामाला लागलेला उशीर, अशा उणिवांवर राष्ट्रवादीकडून बोट ठेवले जात आहे. 

साडेचार वर्षांत संपर्काच्या अभावामुळे भाजपच्या डॉ. मुंडे आणि उशिरा उमेदवारी दाखल झाल्याने बजरंग सोनवणे यांची मतदारांपर्यंत पोहचताना दमछाक होत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत दुष्काळाचा मुद्दा दूर आहे. मराठा आरक्षण, जिल्हा परिषदेचे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेले अध्यक्षपद वंजारी समाजाला दिल्याचा प्रचार राष्ट्रवादीचे समर्थक समाज माध्यमांतून करीत आहेत. दिवंगत मुंडेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना मिळवून दिलेली प्रतिष्ठा भाजपकडून पुढे केली जात आहे. अशा पद्धतीने आता ही निवडणूक जातीवर येऊन ठेपली आहे. सुरवातीलाच काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप पदाधिकाऱ्यांकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण झाली.

शिवसंग्राम दूरच
भाजपनेत्या पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यात सध्या विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत असली, तरी बीडमध्ये मात्र नाही. दोघांनीही एकमेकांची गरज नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Web Title: dr. pritam munde and bajrang sonawane fight in Beed Lok Sabha constituency