Loksabha 2019 : सिंचन, धान्य गैरव्यवहारातून राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली विश्वासहर्ता : गोऱ्हे

अमित गवळे
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन व धान्य गैरव्यवहारातून जनतेची विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली.

पाली (जिल्हा  रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन व धान्य गैरव्यवहारातून जनतेची विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली, अशी टीका आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच आज राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सुधागड तालुक्यातील 21 गणपती मंदिर सभागृहात गुरुवारी (ता.11) सायंकाळी अनंत गीते यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोर्‍हे बोलत होत्या. रायगडपासून बारामतीपर्यंत अक्षरशः घराणेशाही फोफावली आहे. सामान्य जनतेने यांची जुलूमशाही मोडून काढली पाहिजे. सुनिल तटकरेंनी गावागावात भांडणे लावण्याची कामे केली. त्यांनी ग्रामपंचायती सांभाळाव्यात, सुनिल तटकरे गल्लीत तर अनंत गिते दिल्लीत असल्याची टीका गोर्‍हे यांनी केली. राष्ट्रवादी कॉग्रेससोबत फरफटत जाणार्‍या शेकापक्षाला भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. तटकरे यांनी सातत्याने जनतेचा विश्वासघात केला, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. 

प्रविण दरेकर यांनी शे.का.प व राष्ट्रवादीवर टीका केली. हे दोन भ्रष्टाचारी पक्ष एकत्र येवून जनतेला वेठीस धरत आहेत. भ्रष्ट लोकांना सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन आ. दरेकर यांनी केले. देशवासीयांना सुरक्षेची हमी देणार्‍या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अनंत गिते पुन्हा मंत्री असतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. कॉग्रेस व राष्ट्रवादीचे नेते भा.ज.पात दाखल होत आहेत. शरद पवार व तटकरेंनी केवळ कुटुंबाच्या भल्याचे राजकारण केले. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंनी तटकरेंना मोठे केले. त्यांच्याच पाठित खंजीर खुपसण्याचे काम सुनिल तटकरें यांनी केले असल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला.

किशोर जैन म्हणाले, की या निवडणुकीतही सुधागड तालुका मताधिक्यात अग्रेसर राहील. विष्णू पाटील म्हणाले, की रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भ्रष्टाचार व सदाचार अशी आहे.  तटकरेंसारख्या फसव्या माणसाला मते देवू नका असे आवाहन माजी मंत्री रविंद्र पाटील यांनी केले.

यावेळी रविंद्र पाटील, विलास चावरी, विष्णु पाटील, सुनिल दांडेकर, राजेश मपारा, रविंद्र देशमुख, सु.दा.भोय,मिलिंद देशमुख, राजेंद्र राउत, उज्वला देसाई, चंद्रकांत घोसाळकर, राजेंद्र गांधी, अरुण खंडागळे, अलाप मेहता, निखिल शहा, विद्देश आचार्य, वर्षा सुरावकर, सोनल मढवी, निहारिका शिर्के आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

Web Title: Due to Irrigation Scam NCP has lost their trustworthy says Nilam Gorhe