Loksabha 2019 : दुर्योधनालाही होता गर्व : प्रियांका

पीटीआय
मंगळवार, 7 मे 2019

- आश्‍वासने दिली आणि त्यातील किती पूर्ण झाली याची माहिती देण्यापेक्षा भाजपचे नेते बोलतात अन्य मुद्द्यांवरच.

अंबाला : "दुर्योधनालाही असा गर्व होता,' अशा शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख मोदींनी "भ्रष्टाचारी नंबर 1' असा केल्याचा संदर्भ या टीकेला होता. 

अंबालातील कॉंग्रेसच्या उमेदवार कुमारी सेलजा यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना दुसऱ्याच मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान प्रियांका यांनी मोदींना दिले. दुर्योधनाच्या गर्विष्ठपणाचे उदाहरण देताना प्रियांका यांनी हिंदी कवी रामधारीसिंह "दिनकर' यांच्या "जब नाश मनुष्यपर छाता है, पहले विवेक मर जाता है,' या ओळींचा उल्लेख केला. दुर्योधनही गर्विष्ठ होता. कृष्ण त्याला समजवायला गेला, तेव्हा दुर्योधनाने त्यालाच बंदी बनविण्याचा प्रयत्न केला, असे सांगून, तुम्ही पंतप्रधान आहात, भाजपचे बडे नेते आहात. तुम्हाला हे समजायला हवे. अन्यथा लोकच तुम्हाला धडा शिकवतील. ते सुज्ञ आहेत, असा टोला प्रियांका यांनी लगावला. 

भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, की काय आश्‍वासने दिली आणि त्यातील किती पूर्ण झाली याची माहिती देण्यापेक्षा भाजपचे नेते अन्य मुद्द्यांवरच बोलतात. कधी ते गेल्या 70 वर्षांतील सरकारांच्या अपयशचा पाढा वाचतात, तर कधी हुतात्म्यांच्या नावाने मते मागतात आणि कधी माझ्या कुटुंबीयांसह या देशासाठी बलिदान दिलेल्यांवर टीका करतात. मात्र, लोकांचे प्रश्‍न काय आणि ते कसे सोडवावेत, यावर भाजप नेते बोलत नाहीत. निवडणूक एका कुटुंबापुरती मर्यादित नसते, असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duryodhana was also proud says Priyanka Gandhi