Loksabha 2019 : बारणे, पार्थ यांचे  भवितव्य आज मतपेटीत  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. 29) होत आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे मावळातील महायुतीचे श्रीरंग बारणे व महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. 

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. 29) होत आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे मावळातील महायुतीचे श्रीरंग बारणे व महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. 

भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या जागा वाटपात मावळची जागा अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीकडे आहे. मावळ मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये झाली. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. मात्र, त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे होते. यंदा त्यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून हॅटट्रिक साधण्याची मनीषा शिवसेनेची आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना संधी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून मावळ आपल्याकडे खेचून आणण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीची आहे. पवार घराण्याचे राजकीय प्रस्थ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळचा केलेला उल्लेख यामुळे येथील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष मावळकडे लागले आहे. 

पार्थ @ 44 दिवस प्रचार 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मावळमधून निवडणूक लढतील अशी शक्‍यता होती. परंतु, पार्थ यांची उमेदवारी 15 मार्चला जाहीर झाली. त्यांना कॉंग्रेसने सामर्थ्याचा हात दिला आणि प्रचाराला सुरवात झाली. त्यानंतर दोन दिवसांनी स्वतः पवार यांनी वाल्हेकरवाडीत जाहीर सभा घेतली. त्यांना शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली. प्रचारात रंग चढू लागला. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचारासाठी त्यांना तब्बल 46 दिवसांचा कालावधी मिळाला. सर्व मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. 

बारणे @ 37 दिवस प्रचार 
महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघ भाजपला सोडा किंवा उमेदवार बदला, अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली. यामुळे युतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता होती. अखेर 22 मार्च रोजी श्रीरंग बारणे यांची उमेदवारी शिवसेनेने घोषित केली. प्रचारासाठी त्यांना 39 दिवसांचा अवधी मिळाला. परंतु, त्यांच्या उमेदवारीवर जगताप नाराज होते. प्रचारापासून अलिप्त होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर ते सक्रिय झाले आणि प्रचाराला रंग चढला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fate of Shrirang Barane, Parth Pawar will be decided today in Shirur Loksabha Constituency