Loksabha 2019 : अखेरच्या टप्प्यातील राज्यात आज लढाई

Loksabha 2019 : अखेरच्या टप्प्यातील राज्यात आज लढाई

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 29) होणाऱ्या मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या टप्प्यात 9 राज्यांतील 71 जागांवर मतदान होणार असून, यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 17 जागांचा समावेश आहे. विशेषतः देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान असल्याने साऱ्या देशाचे लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा चौथा व अखेरचा टप्पा असणार आहे.

मुंबापुरीच्या तारांगणात मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर या उमेदवारांची गर्दी आहे. उद्याच्या टप्प्यात बिहार (5) , झारखंड (3), मध्य प्रदेश (6), ओडिशा (6), उत्तर प्रदेश (13), राजस्थान (13), पश्‍चिम बंगाल (8) या राज्यांतही मतदान होणार आहे. याआधीच्या तीन टप्प्यांत लोकसभेच्या 543 पैकी 303 जागांवरील मतदान पार पडले असून, उद्याच्या टप्प्यानंतर ही संख्या 374 वर पोचेल.

लोकसभेची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील शहाजहॉंपूर, हरदोई, उन्नाव, फारूकाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, झाशी व हामीरपूर आदी प्रतिष्ठेच्या जागांवर लढती होतील. सध्या या 13 पैकी डिंपल यादव यांची जागा वगळता साऱ्याच्या साऱ्या जागा भाजपच्या कब्जात आहेत. मात्र, यंदा सप-बसप महाआघाडीमुळे व कॉंग्रेसमध्ये प्रियांका गांधींच्या सक्रिय आगमनाने राज्यातील समीकरणे 2014 प्रमाणे एकतर्फी न राहता लक्षणीयरीत्या बदलण्याची चिन्हे आहेत. 

कन्हैया कुमारकडे लक्ष

बिहारच्या पाचपैकी बेगुसरायची जागा यंदा "हॉट' सीट मानली जाते ती "जेनयू'चा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या आगमनाने. भाजपने तेथे गिरिराजसिंह यांना हलविले असले, तरी कन्हैया कुमारने प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशातील सहा जागांपैकी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाड्यातून व माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे पुत्र राहुल सीधीमधून मैदानात आहेत.

आपली संपत्ती 660 कोटी दाखविणारे नकुलनाथ हे चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. या राज्यातील साऱ्या जागा जिंकण्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः सूत्रे हलविली आहेत. मात्र, मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी व भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या रोजच्या रोज जी मुक्ताफळे उधळत आहेत; त्याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

सुरक्षा दलांची परीक्षा 

भाजपला ज्या पश्‍चिम बंगालमधून मोठ्या आशा आहेत; तेथील 8 पैकी 6 जागा सध्या तृणमूलच्या ताब्यात आहेत. ज्या भागांत उद्या मतदान होणार आहे; त्या वीरभूम, पूर्व-पश्‍चिम बर्धमान व मुर्शिदाबाद जिल्ह्यांत निवडणूक काळातील प्रचंड हिंसाचार हा नेहमीचा इतिहास आहे. या स्थितीत उद्याच्या टप्प्यात खरी परीक्षा सुरक्षा दलांसह निवडणूक आयोगाचीच होणार आहे. 

स्टारपुत्रांची सत्त्वपरीक्षा

राजस्थानच्या 13 जागांपैकी भाजप नेते व माजी संरक्षणमंत्री जसवंतसिंह यांचे कॉंग्रेसवासी पुत्र मानवेंद्रसिंह (बाडमेर) व माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांचे खासदारपुत्र दुष्यंतसिंह (झालावाड) या स्टारपुत्रांची उद्या सत्त्वपरीक्षा आहे. येथेही कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या पुढच्या पिढीला वैभव गेहलोत यांना जोधपूरमधून रिंगणात उतविले आहे. 

...यांचे भवितव्य ठरणार

मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर (सर्व महाराष्ट्रातून), कन्हैया कुमारच्या बेगुसरायपासून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (फारूकाबाद), बाबूल सुप्रियो (आसनसोल), विजयंता पांडा (केंद्रापाडा), साक्षी महाराज (उन्नाव), डिंपल यादव (कन्नौज), श्रीप्रकाश जयस्वाल (कानपूर), मानवेंद्रसिंह (बाडमेर), वैभव गेहलोत (जोधपूर) आदी दिग्गजांचे भवितव्य आज (ता. 29) मतदानयंत्रांत बंद होणार आहे. 


राज्ये 

71 
देशातील मतदारसंघ 

17 
महाराष्ट्रातील मतदारसंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com