Loksabha 2019 : भाजप व पाकिस्तानची मैत्री : जयंत पाटील 

Jayant.jpg
Jayant.jpg

पिंपरी : ''भारतीय जनता पक्ष आणि पाकिस्तानचे नाते जुने राहिले आहे. भाजपचे सरकार असताना त्यांनी पाकिस्तानवर प्रेम दाखवले आहे, या दोघांची मैत्री म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता. 25) केली.  मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप सोपल, दत्तात्रेय भरणे, नगरसेवक विनोद नढे उपस्थित होते. 

ते म्हणाले, "केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना त्यांचे पाकिस्तानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. लालकृष्ण अडवानी यांनी महंमद अली जिना यांची स्तुती केली होती. जसवंतसिंह यांनी पुस्तक लिहिले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुर्शरफ यांना आग्रा भेटीचे निमंत्रण त्यांच्याच काळात देण्यात आले होते. जैश ए महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहरला वाजपेयी सरकारच्या काळातच सरकारी विमानाने नेऊन सोडले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिले होते. शरीफ यांच्या वाढदिवसाला मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली होती.'' 2008 मध्ये मुंबईवर हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांनी जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पठाणकोट, उरी, पुलवामा हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. देशात यूपीएचे सरकार सत्तेत असताना अनेक वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र, सरकारने त्याचा गवगवा केला नाही. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची जबाबदारी कोणाची याची चौकशी व्हायला हवी, असे पाटील यांनी नमूद केले. 

देशातील जनतेला खोटी स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारने पाच वर्षांत एकही स्वप्न पूर्ण केले नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. ते म्हणाले, "दोन कोटी रोजगार, देशाच्या तिजोरीची चौकीदारी, यापैकी कशाचीच त्यांना पंतप्रधान झाल्यावर आठवण राहिली नाही. जीएसटीमधून 100 कोटी जनतेवर गब्बर सिंग टॅक्‍स लावला. त्यांच्या कारभारामुळे देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे.'' मावळचे नेतृत्व करणारे खासदार पंतप्रधान आवास योजनेचे टेंडर रद्द करावे, असे पत्र नगरविकास विभागाला देत असतील, तर ते या परिसराचा काय विकास करणार, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com