Loksabha 2019 : पुण्यात नोकरीला असलेल्या सोलापूरकरांना मतदानासाठी द्या सुट्टी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

सोलापुरातून पुण्यात नोकरीला गेलेल्या युवक व नागरिकांना सोलापूर लोकसभेसाठी 18 एप्रिल या मतदानादिवशी सुट्टी मिळायला हवी.

सोलापूर : सोलापुरातून पुण्यात नोकरीला गेलेल्या युवक व नागरिकांना सोलापूर लोकसभेसाठी 18 एप्रिल या मतदानादिवशी सुट्टी मिळायला हवी अशी मागणी युवा सेनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांना सोलापूर विमानतळावर निवेदन दिले. 

सोलापुरातील हजारो युवक नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास आहेत. सोलापूर लोकसभेसाठी येत्या 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे, मात्र सोलापुरातून पुण्यात गेलेल्या युवकांना 19 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 50 हजाराहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे यासाठी निवेदन देण्यात आल्याचे श्री. काळजे यांनी सांगितले. 

यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर, जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे, तालुका युवाधिकारी प्रसाद निळ, कॉलेज कक्ष प्रमुख शुभम घोलप, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, विधानसभा संघटक खंडू सलगरकर, उपजिल्हा युवा अधिकारी अमर बोडा उपस्थित होते.

Web Title: give holiday for Voting demanding by Solapur Voters