Loksabha 2019 : नेहरू-गांधी घराण्याच्या त्यागाचा सन्मान करा : पवार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

- नेहरू व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला.

- त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी.

आष्टी (जि. बीड) : "नेहरू व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी; अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना आज दिला. नरेंद्र मोदी सभांमध्ये दुष्काळ, बेरोजगारी आणि शेतकरी यांच्याऐवजी माझ्यावर बोलतात. माझी चिंता करण्यापेक्षा या प्रश्‍नावर बोला, असेही पवार म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आज आष्टी येथे झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी मागच्या 60 वर्षांत काहीच झाले नाही, असे नेहमी सांगतात. मात्र, पंडित नेहरूंनी देशाला जगातील सर्वांत मोठी लोकशाही दिली. इंदिरा गांधींनी देशाच्या हिताचे रक्षण केले. पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाला भारताची ताकद दाखवून दिली. राजीव गांधी यांनी विज्ञानवादाचा स्वीकार केल्यानेच देशात फोन आले.

राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांची मुले आज देशासाठी काम करीत आहेत. एकूणच, नेहरू व गांधी घराण्याचा त्याग आणि बलिदान विसरता येणार नाही. त्यांच्या त्यागाचा पंतप्रधानांनी सन्मान करावा; अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत. मोदी स्वत:ला देशाचे रक्षण करणारा पंतप्रधान असे म्हणवून घेतात; मग पुलवामात स्फोटके कशी आली आणि 40 सैनिकांना बलिदान का द्यावे लागले, असा सवालही पवार यांनी विचारला. 

मोदींवर टीकास्त्र... 

- ज्यांना स्वत:चे कुटुंब नाही, त्यांनी माझी काळजी करू नये. 
- पंतप्रधान होण्यापूर्वी कर्जमाफीचे आश्‍वासन दिले आणि नंतर शेतकऱ्यांऐवजी बड्या उद्योगपतींना मदत केली. 
- या सरकारने मराठा, धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केली.

Web Title: Honor the sacrifices of Nehru and Gandhi family says Sharad Pawar