Loksabha 2019 : राहुल गांधी पंतप्रधान झालेले चालतील : राज ठाकरे

वृत्तसंस्था
रविवार, 7 एप्रिल 2019

'राज'भाष्य 
माझ्यामुळे कॉंग्रेसचा फायदा झाला तरी चालेल. 
फाळणीच्या वेळी संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. 
राजीवजींच्या हत्येनंतर भाजपने कॉंग्रेसला मतदान केले. 
सरकारकडे सांगण्यासारखे आता काहीच नाही. 
हिंदू-मुस्लिम, गोहत्या, हवाई हल्ल्याचे राजकारण. 
मोदींच्या घोषणांचा संबंध हा हिटलरशी. 
नोटाबंदीचे पैसे निवडणुकीत वापरण्यात आले. 

मुंबई : देशाची लोकशाही व देश वाचवायचा असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे देशद्रोही सरकार हाकलायलाच हवे. येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे आणि मोदीमुक्त भारताचे जाओ अशा शुभेच्छा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. 

राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आजपर्यंतचे पंतप्रधान जनतेने निवडले नव्हते, त्या त्या परिस्थितीत बहुमतात असलेल्या राजकीय पक्षांनी निर्णय घेतले. म्हणजेच या पदासाठी प्रयोगच आजपर्यंत करण्यात आले असून, आता आणखी एखादा प्रयोग करून बघू या, राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्यांच्या हातून चांगली गोष्टही घडू शकते, परंतू देशाला घातक असलेली मोदी-शहांची जोडगोळी हाकलून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

देशात गेल्या पाच वर्षांत नोटाबंदीपासून पुलवामा हल्ल्यापर्यंत असंख्य गोष्टी घडल्या, त्याचे परिणाम जनतेने भोगले, मात्र यावर पंतप्रधान किंवा भाजपवाले बोलायला तयार नाहीत, याची उत्तरे मोदी देत नाहीत. कुणी प्रश्‍न विचारलाच तर त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. 
सर्व प्रसारमाध्यमे धमक्‍यांच्या जोरावर दाबून टाकली आहेत. हिटलरच्या काळातही अशीच परिस्थिती होती. म्हणजेच मोदी-शहा यांना लोकशाहीच नष्ट करायची आहे. त्यांनी आता रंग दाखवायला सुरवात केली आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा निवडून आले तर देशात निवडणुकाच होणार नाहीत, तुम्हाला लोकतांत्रिक अधिकारच उरणार नसल्याने तुम्हाला विचारतो कोण, असा सवाल राज यांनी केला. या वेळी राज यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून सरकारचा भंडाफोड केला. 

"राज'भाष्य 
माझ्यामुळे कॉंग्रेसचा फायदा झाला तरी चालेल. 
फाळणीच्या वेळी संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. 
राजीवजींच्या हत्येनंतर भाजपने कॉंग्रेसला मतदान केले. 
सरकारकडे सांगण्यासारखे आता काहीच नाही. 
हिंदू-मुस्लिम, गोहत्या, हवाई हल्ल्याचे राजकारण. 
मोदींच्या घोषणांचा संबंध हा हिटलरशी. 
नोटाबंदीचे पैसे निवडणुकीत वापरण्यात आले. 

गुजराती कंपनीचा दाखला 
"मुद्रा लोन' योजनेचा उल्लेख करताना राज यांनी अहमदाबाद येथील कॅपिटल वर्ल्ड प्लॅटफॉर्म प्रा. लि. या कंपनीला मोदी-शहा यांनी 1800 कोटी रुपयांची खिरापत वाटल्याचा आरोप केला. या कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांनी मोदी यांना निवडणुकीत मदत केली होती. यावरून आजपर्यंत देशात इतके घाणेरडं राजकारण कुणी केल्याचं मी आयुष्यात बघितलं नाही, त्यामुळे देशाशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशा इशारा राज यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identity of Narendra Modi in the World as Feku says Raj Thackeray